न बोलताच जुळली मनं...दिव्यांग मुलीला बनविले जीवनसाथी 

सुनील पाटील
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम म्हटला म्हणजे चहा- पोहे होतात. हे झाल्यानंतर मुलीला समोर बसवून तुझे नाव काय, शिक्षण किती झाले, पुढे काय करायचेय...असे प्रश्‍न विचारून मुलीला व्यवस्थित बोलता येते की नाही. याची तपासणी मुलाकडील मंडळींकडून केली जाते. परंतु मुलीला पाहण्यासाठी गेले असताना न बोलताच मन जुळले आणि दिव्यांग असली तरी तिलाच जीवनसाथी बनविण्याचा निर्णय शारिरीक दृष्ट्या पूर्णतः सक्षम असलेल्या प्रदीप बर्गे या तरूणाने घेतला. 

चोपडा : लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या असतात असा समज असला तरी आजच्या विज्ञान युगातील हायटेक जमान्यातही काही जण आपापल्या परिने आदर्श घडवित असतात. अशाच एका तरुणाने दिव्यांग (ऐकू व बोलता न येणारी मूकबधिर) मुलीशी विवाह करण्यास होकार देत सामाजिक भावना जोपासली आहे. समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. गुरूवारी (ता. 27) त्यांचा साक्षगंध (साखरपुडा) सोहळा पार पडला आहे. 

हेपण पहा - पंगतीची तयारी सुरू असताना हुंडा मागून मोडले लग्न

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील तेजस्विनी ही दिव्यांग मुलगी. स्वत:च्या भावना शब्दात व्यक्त न करू शकणाऱ्या तेजस्विनीचा साक्षगंध (साखरपुडा) जालना जिल्ह्यातल्या चिखली (ता. बदनापूर) येथील प्रदिप जनार्दन बर्गे (कोष्टी) या तरुणाशी नुकताच झाला. त्यांचा शुभमंगल सोहळा पुढील महिन्यात होणार आहे. प्रदीप बर्गेने मूकबधीर तेजस्विनीला जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याने समाजातून त्याचे अभिनंदन केले जात आहे. 

Image may contain: 2 people, including Narendra Kalish Patil, people standing

रिक्षा चालक बापाला होती चिंता 
चोपडा येथील पाटील गढी भागातील रहिवासी असलेले गणेश पंडीत कोष्टी यांची एकुलती एक मुलगी तेजस्विनी ही जन्मतः मूकबधीर, एक सर्वसामान्य परिस्थितीतील गणेश कोष्टी हे रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवितात. त्यात एकच मुलगी व ती पण जन्मतः दिव्यांग असल्याने तिचा विवाहाची काळजी पित्याला होती. पण मुलगी पाहण्यासाठी स्थळ आले आणि त्यांच्याकडून होकारही आला. यामुळे वडीलांची चिंता दूर झाली आहे. 

प्रदीप इलेक्‍ट्रॉनिक दुकानावर 
जालना जिल्ह्यातील चिखली (ता. बदनापूर) येथील शारिरीक दृष्ट्या पूर्णतः सक्षम असलेल्या प्रदीप जनार्दन बर्गे या तरुणाने तेजस्विनीला जीवनसाथी म्हणून स्वीकारण्यास होकार दिला. प्रदीप हा नाशिक येथे रहिवास असून एका नामवंत इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानावर मेकॅनिकचे काम करतो. तर तेजस्विनी ही एफवायबीएचे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती चोपडा येथील कस्तुरबा विद्यालयातील क्रिडाशिक्षक व्ही. पी. कोष्टी यांची पुतणी आहे. दोघांचा गुरूवारी (ता. 27) चिखली (ता. बदनापूर) येथे सुपारी फोडणे व साक्षगंध सोहळा शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला असून पुढील महिन्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 

शासनाने लक्ष घालावे 
समाजातील बेवारस मतिमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांचे काय होते. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी किंवा पोषण व निवासासाठी सरकारी योजना नाहीत. त्या सुरू करायला हव्यात. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news handicapped girl marriage decision boy and engagement