"मविप्र' अभियांत्रिकीच्या प्रांगणात भरली "रॅंचों'ची जत्रा 

residenational photo
residenational photo

नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या रॅंचोंनी केले आहे. या रॅंचोंना व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांचे कार्य नागरिकांपुढे पोचविण्याची संधी "सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्ताने लाभली. गंगापूर रोडवरील "मविप्र संस्थेच्या "नाशिक इनोव्हेशन फेस्ट-2018'द्वारे उपलब्ध झाली. शुक्रवारी (ता. 16) नाशिककरांना प्रदर्शनातील प्रकल्प पाहण्याची संधी उपलब्ध असेल. हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत खुले असेल. 
   बळीराजाच्या साथीला धावत विकसित केलेल्या अवजारांसह नैसर्गिक संसाधनांचे जतन करताना सौरऊर्जेच्या वापराचे प्रकल्प, सर्वसामान्यांचे जगणे स्मार्ट बनविणारे प्रकल्प, तसेच विकसित तंत्रज्ञानाची मदत घेऊन जगणे सुखकर बनविणाऱ्या प्रकल्पांचेही सादरीकरण प्रदर्शनाद्वारे केले जात आहे. शालेय, महाविद्यालयीन जीवनात सुचलेल्या भन्नाट संकल्पनांतून उत्पादन बनविण्यापर्यंतच्या युवा संशोधकांना चालना देण्यासाठी प्रदर्शन उपयोगी ठरत आहे. खुल्या गटातून समाजातील विविध स्तरांवरील व्यक्‍तींकडून आपल्या आगळ्यावेगळ्या संकल्पना इतरांपर्यंत पोचण्यास प्रदर्शनाची मदत होत आहे. सहभागी प्रकल्पांची माहिती खास नाशिककरांसाठी... 

"मविप्र' आयटीआयचे बहुउपयोगी उपकरण 
"मविप्र'च्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले बहुउपयोगी उपकरण आकर्षणाचा विषय ठरले. ड्रीलिंग, स्टिल कटिंग, वूड कटिंग अन्‌ ग्राईंडिग असे विविध कामांसाठी उपयोगी पडणारे हे यंत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. इतकेच नव्हे, तर वीजबचतीस मदत करणाऱ्या या उपकरणामुळे बिलाचा खर्च कमी होऊन ती बचत होण्यास मदत होऊ शकते. हा प्रकल्प प्रशांत पेखळे व कुशल जगताप यांनी साकारलाय. 

ऑइलच्या पातळीची माहिती देणारी प्रणाली 
दुचाकी, चारचाकी असो किंवा कंपनीतील मोठमोठ्या मशिनरी, प्रत्येकात ऑइलची आवश्‍यकता भासते. साहजिकच हे ऑइल वेळोवेळी बदलावे लागते, पण ऑइल बदलण्यात उशीर झाल्यास यंत्राचा घसारा होतो अन्‌ मोठे नुकसान होण्याची भीती असते. यावर पर्याय म्हणून सेन्सरचा उपयोग करत ऑइलची पातळी व गुणवत्तेची माहिती देणारी प्रणाली सिन्नर येथील "मविप्र'च्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे. या प्रकल्प मयूर कांडेकर, श्रीकांत छल्लारे, अमोल सानप, अंतिम शिरसाठ व वैभव ढगे यांनी साकारला. 


हवेतून चार्ज होणारी इलेक्‍ट्रिक कार 
वाहनांच्या वाढत्या संख्येसोबत इंधनाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषणात भर पडते ती वेगळीच. त्यामुळे इलेक्‍ट्रिक कार हा उत्तम पर्याय सुचविला जातो. त्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत वाहनाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याद्वारे वीजनिर्मिती करत व वीज बॅटरीत साठवून त्याद्वारे इलेक्‍ट्रिक कार चालेल, अशी व्यवस्था मालेगाव येथील "मविप्र' आयटीआयचे विद्यार्थी नितीन पवार, चारुदत्त शिंदे यांनी केली आहे. 


डोंगराळ भागात पावसाच्या पाण्याचा प्रभावी उपयोग 
डोंगराळ भागात पावसाचे पाणी वाहून वाया जाऊ नये यासाठी सर्वेक्षण व अभ्यास करून "मविप्र' संस्थेच्या ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प साकारला. विविध उपाययोजनांच्या सहाय्याने वाहत्या पाण्याचा वापर करून घेत, भूजलपातळी वाढविण्यासह जमिनीची झीज कमी करण्याचे तंत्र मांडण्यात आले आहे. आकाश पाटील, दर्शन भामरे, महेश सोनवणे, प्रसाद तांबोळी, अखिलेश जगताप यांनी हा प्रकल्प साकारला आहे. 


वाहतुकीच्या प्रश्‍नावर शोधला रामबाण उपाय 
"मविप्र' अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी द्वारका परिसरातील सर्वेक्षण करून तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठीचा प्रकल्प सादर केला आहे. इंटेलिजन्स ट्रान्स्पोर्टेशन सिस्टिम या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी द्वारकाची प्रतिकृती सादर केली आहे. तसेच वाहतुकीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. हा प्रकल्प महापालिका आयुक्‍त व महापौरांना दाखवत त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा प्रकल्प दुर्वाक्षी पाटील, विधी पटेल, तन्वी कनगरे, मिनू जोस यांनी सादर केला आहे. 

पुणेगावच्या पाणीप्रश्‍नाची विद्यार्थ्यांकडून दखल 
"मविप्र' अभियांत्रिकीच्या सिव्हिल शाखेच्या विद्यार्थ्यांनी कळवण तालुक्‍यातील पुणेगावचे सखोल सर्वेक्षण करत तेथील पाण्याच्या प्रश्‍नावर उपाययोजना सुचविल्या आहेत. विद्यार्थ्यांनी टोपोग्राफीचा सखोल अभ्यास करताना तेथील उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर, पुनर्वापराचे पर्याय यांसह अन्य विविध पर्याय सुचविले आहेत. हा प्रकल्प रिद्धी राठोड, अंकिता वाघ, सौरभ पेखळे, ओंकार पाचपिंड यांनी साकारला. 

बळीराजाच्या मदतीसाठी "ड्रोन' 
चांदवड येथील एसएनजेबी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मल्टिपर्पज ऍग्रिकल्चर ड्रोन साकारला. ड्रोनच्या सहाय्याने शेतीत फवारणीचे तंत्र या प्रकल्पातून मांडले आहे. सध्याच्या प्रकल्पानुसार चार मिनिटांपर्यंत एक लिटर रसायनांची फवारणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रकल्पाचे व्यावसायीकरण करत फवारणीची वेळ व क्षमता दोन्ही वाढविता येणे शक्‍य आहे. हा प्रकल्प अरबाज पिंजारी, राहुल देवरे, पंकज सूर्यवंशी, अविनाश शिरसाठ यांनी सादर केला आहे. 

माळीणची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न 
पुण्यानजीकच्या माळीण येथे भूस्खलनाने मोठी जीवितहानी झाली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चांदवडच्या "एसएनजेबी' महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "स्लायडिंग सेगमेंटर रिटेनिंग वॉल' हा प्रकल्प साकारला आहे. यात उंच ठिकाणी वस्तीच्या संरक्षक भिंतीला स्लायडरचा पर्याय दिला आहे. यात भूस्खलन झाल्यास नजीकच्या वस्तीतील नागरिकांना त्याची सूचना मिळेल व ते आपला जीव वाचवू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. माती कोसळल्याने भिंत सरकेल व माती त्यात साठविली जाईल, अशी व्यवस्थादेखील केली आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थी पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. समीक्षा घोगरे, मधुर गुजराथी, बबल जगताप, प्रणाली हांडगे, अंकिता चोभारकर यांनी हा प्रकल्प साकारला. 

रिक्‍त वाहनतळाची माहिती देण्यासाठी यंत्रणा 
शहरात फिरताना वाहन उभे करण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. यावर तोडगा म्हणून मातोश्री अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट पार्किंग सिस्टिम विकसित केली आहे. यात आयओटी तंत्राच्या सहाय्याने वापरकर्त्याला आपल्या नजीकच्या रिक्‍त वाहनतळांविषयी सहज माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी व्यवस्था केली आहे. आयआर सेन्सरच्या माध्यमातून हे शक्‍य होऊ शकेल. हा प्रकल्प निखिल गडाख, पूजा पेखळे, दयेश पुजारी, धनेश वैशंपायन यांनी साकारला आहे. 

सैन्याच्या मदतीसाठी निगराणी ठेवणारा रोबोट 
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सैन्यदलाच्या मदतीसाठी निगराणी ठेवणारा रोबोट साकारलाय. सीमावर्ती भागात टेहाळणी करत तेथील माहिती सर्व्हर रूमला पाठवत देशाचे संरक्षण करणारा हा रोबोट आयओटी तंत्रावर चालतो. मोशन डिटेक्‍टरचा यात वापर केला असून, रिमोर्ट कंट्रोलच्या सहाय्याने हाताळता येईल असे हे उपकरण गौरव बागूल, कल्पना कापडे, विक्रम उदावंत, जयेश झोपे यांनी तयार केले आहे. 

वायरलेस कार चार्जिंगद्वारे भविष्यातील वेध 
मोबाईलच्या हेडफोनपासून अन्य विविध गॅझेट वायरलेस बनले आहेत, पण भविष्याचा वेध घेताना वायरलेस कार चार्जिंग स्टेशन महावीर पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. या प्रकल्पात पेट्रोल स्टेशनप्रमाणे चार्जिंग स्टेशन विकसित केले आहे. येथे आलेली कार आल्यावर वायर जोडणी न करताच इलेक्‍ट्रिक कार चार्जिंग होईल अशी व्यवस्था केली आहे. हा प्रकल्प आदेश पिंगळे, ऋषिकेश बैरागी, दीपक साळुंखे, गणेश मोजड यांनी सादर केला. 

पुराचा धोका कळणारी यंत्रणा ठरेल फायदेशीर 
पुराच्या पाण्यामुळे काठावरच्या वस्तीतील लोकांचे मोठे नुकसान होत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन आयआर सेन्सरचा वापर करत पुराचा धोका कळविणारे यंत्र महावीर पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. यात पाण्यात सापडलेले सर्किट पूर्ण झाल्यानंतर अलार्म वाजेल, अशी व्यवस्था केली आहे. हा प्रकल्प दीपक जोशी, संदीप चौधरी, वृषाली जाधव, शुभांगी घोलप यांनी साकारला. 

फळांपासून बनविलेल्या वाइनचे  प्रदर्शनात सादरीकरण 
"वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' अशी ओळख असलेल्या नाशिकमधील वाइन निर्मितीचे शिक्षण देणाऱ्या गार्गी ऍग्रिकल्चर रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत प्रदर्शनात सहभाग आहे. स्ट्रॉबेरीपासून तर सफरचंद, अननस, पपईसह अन्य विविध फळांसह सुपारीपासून तयार केलेली वाइन प्रदर्शनात मांडलेली आहे. वाइनमध्ये वापरली जाणारी सुगंधी द्रव्येदेखील पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. हा प्रकल्प अर्चना काळे, वेदांत भगत, रजनीकांत भापकर, सूरज मेहबुबानी, श्रीमती खैरनार यांनी उपलब्ध करून दिला. 

औद्योगिक कंपन्यांसाठी सीएनसी कंट्रोलर 
औद्योगिक कंपन्यांमधील मेकॅनिक लॅबमध्ये उपयोगी पडेल असे सीएनसी कंट्रोलर गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. कमी खर्चातील संशोधनांपैकी एक असलेल्या या प्रकल्पात अन्य विविध पर्याय सुचविण्यात आले आहेत. हा प्रकल्प दीपक वऱ्हाडे, अनुष्का आवारे, देवयानी खैरनार यांनी सहभाग नोंदविला. सीएनसी कंट्रोलचा यात वापर केला. 

स्मार्ट एनर्जी मीटरद्वारे वाचेल वेळ व परिश्रम 
सध्या वीजबिलासाठी मीटर रीडिंगकरिता मानवीय पद्धतीने यंत्रणा राबत असते, पण आयओटी तंत्राचा उपयोग करून गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट एनर्जी मीटर प्रकल्प साकारलाय. यात इंटरनेटच्या वापराने वीजमीटरचे रीडिंग आपोआप महामंडळाला कळेल, अशी यंत्रणा विकसित केली आहे. हा प्रकल्प मनीष कापडणीस, मुस्कान परदेशी, विष्णुराज शिवण, नजिया शेख यांनी साकारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com