LOKSABHA 2019 जनतेचा जाहिरनामा-सत्तांतराने नाशिकच्या पर्यटन विकासाचा विचका 

विक्रांत मते
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नाशिक ः हवामान, पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणेच डोंगरदऱ्या ही नैसर्गिक देणगी नाशिकला लाभली आहे. परंतु पर्यटनाच्या अंगाने विचार केल्यास त्याचा लाभ सध्याच्या युती सरकारमुळे नाशिककरांच्या पदरात पडलेला नाही. धार्मिक पर्यटनासाठी नाशिक प्रसिद्ध असले तरी पायाभूत सुविधांअभावी धार्मिक पर्यटनासाठी अपेक्षित पर्यटक संख्या पोचत नसल्याची खंत नाशिककरांमध्ये आहे. जिल्ह्यातील पर्यटनाची क्षमता ओळखून पर्यटनस्थळांचा विकास करून त्यातून अधिकाधिक रोजगार निर्माण होऊन आर्थिक विकास साध्य होणे गरजेचे आहे. 

नाशिकमध्ये पर्यटनाला मोठा वाव आहे. लोणावळा, खंडाळाप्रमाणेच इगतपुरी व कसारा घाटाचे सौंदर्य आहे. या भागात शासनाने वेलनेस सेंटरची उभारणीची घोषणा केली होती, पण अद्याप ती योजना कागदावरच आहे. धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये दर वर्षी हजारो भाविक येतात; परंतु रामकुंड, त्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगगड, शिर्डीव्यतिरिक्त भाविकांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी नाही. 2011 मध्ये गंगापूर धरण येथे बोट क्‍लब व पक्षिनिरीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. पण या योजना सत्तांतरानंतर बंद पडल्या. उलट गंगापूर धरणावरील बोटी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे हलविण्यात आल्या. नाशिकमधील द्राक्षांची ख्याती लक्षात घेऊन ग्रेप पार्क रिसॉर्ट तसेच हौशी पर्यटकांसाठी अंजनेरी येथे ट्रेकिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या योजनादेखील कागदावरच राहिल्या. 

पर्यटनवाढीसाठी अपेक्षा 
- पर्यटनस्थळांपर्यंत सुसज्ज रस्ते हवेत 
- विभागनिहाय पर्यटन विकास महामंडळाची स्थापन व्हावी 
- विमान व रेल्वेसेवा पर्यटनस्थळांपर्यंत पोचावी 
- रेल्वेचे आरक्षण दोन महिने अगोदर मिळावे 
- धार्मिक पर्यटन वाढविण्यासाठी गुजरात व राजस्थान राज्ये रेल्वेने जोडली जावीत 
- धार्मिक पर्यटनाच्या स्थळी वॉटर स्पोर्टस, मनोरंजन उद्याने, थिम पार्क उभारावे 
- कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात वीज, पाणी व अर्थपुरवठा व्हावा 
- पर्यटनस्थळांवरील स्वच्छतेला महत्त्व द्यावे 
- पौराणिक स्थळांच्या देखभालीसाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा 
- पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिस, परिवहन विभाग, पर्यटन विभागात सुसूत्रता आणावी 
- नाशिकची संस्कृती, समारंभ, उत्सव आदींचे ब्रॅन्डिंग व्हावे 
- धार्मिकबरोबरच मेडिकल, ऍडव्हेंचर टुरिझम, कृषी पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत 

नाशिकमध्ये पर्यटनाला मोठी संधी आहे. मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा, खंडाळा या घाटांमध्ये ऍडव्हेंचर पार्क आहे. त्याच धर्तीवर नाशिकमधील कसारा, इगतपुरी भागात थिम पार्कची निर्मिती झाल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. 
- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिऐशन ऑफ नाशिक 

Web Title: marathi news JAHIRNAMA