वीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

जळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे. शिवाय, पॉवर फॅक्‍टर पेनल्टीच्या अतिरिक्त आकारणीनेही उद्योजक त्रस्त असून, त्याविरोधात जळगावातील विविध औद्योगिक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 
वीज मंडळाच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ लघु उद्योग भारतीसह विविध अकरा औद्योगिक संघटनांनी शनिवारी (15 डिसेंबर) लाक्षणिक उपोषणास बसण्याचा निर्धार केला आहे. 

यासंदर्भात लघु उद्योग भारतीच्या जळगाव शाखेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष हेमंत देशमुख व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ऊर्जासमिती अध्यक्ष छबिराज राणे यांनी माहिती दिली. 12 सप्टेंबरला औद्योगिक वीज वापराच्या दरात वाढ करण्यात आली, आणि एरवी त्यासाठी तीन महिन्यांची पूर्वसूचना देण्याची पद्धत असताना ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली. ऑक्‍टोबर- नोव्हेंबरच्या वीज बिलात ही दरवाढ लागून आल्याने उद्योजकांना हा मोठा धक्का होता. महावितरणची दरवाढीची याचिका दाखल झाल्यानंतर कंपनीच्या मागण्यांचे समर्थन करणाऱ्या संचालकांच्या 19 जुलैच्या लेखात औद्योगिक दरवाढ 2 टक्‍क्‍यांहून अधिक दरवाढ होणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र, आता जवळपास 80 टक्के ग्राहकांना सुमारे 20 टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ बिलात लागून आली आहे. 

इन्सेंटिव्ह कमी, पेनल्टी अधिक 
गेल्या काही महिन्यांत सरकारने पॉवर फॅक्‍टर इन्सेंटीव्हमध्येही कपात केली असून, उलटपक्षी पॉवर फॅक्‍टर पेनल्टीची आकारणी वाढवली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सर्वसामान्य उद्योजकावर त्याचा भार पडत असून अनेक उद्योग संकटात सापडले आहेत. ही वीजदरवाढ व पेनल्टीची अतिरिक्त आकारणी मागे घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस लघु उद्योग भारतीचे सचिव समीर साने, कोशाध्यक्ष देवेंद्र अग्रवाल, जतिन ओझा, स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत बेंडाळे, भाजप उद्योग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष अरुण बोरोले, पाइप मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा आदी उपस्थित होते. 
 
या संघटनांचा सहभाग 
सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ विविध औद्योगिक संघटनांनी 15 डिसेंबरला लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरापासून उद्योजक उपोषणास बसतील. यात लघुउद्योग भारती, प्लॅस्टिक पाइप मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन, मॅट मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन, जळगाव रिप्रोसेसर्स असोसिएशन, दाल मिल संघटना, व्ही सेक्‍टर असोसिएशन, जिंदा, एम. सेक्‍टर चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव इंडस्ट्रिअल यूथ असोसिएशन, जळगाव इंजिनिअरिंग असोसिएशन आदी संघटना सहभागी होतील. 

Web Title: marathi news jalgain electricity rate udyoge