गिरीश महाजनांना मतदारसंघातच ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक', निवडणुकीत करिष्मा करणारे नेते- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघातच ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार देण्याचाही शोध सुरू आहे. 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक', निवडणुकीत करिष्मा करणारे नेते- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर मतदारसंघातच ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार देण्याचाही शोध सुरू आहे. 
विधानसभा निवडणुकीत जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामनेरमध्ये महाजनादेश यात्रा गेली असता त्यावेळीच जाहीर केले होते. महाजन हे जामनेर मतदारसंघात केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असतील. ते राज्यभर भाजप उमेदवारांचा प्रचार करतील. त्यामुळे महाजन हे विधानसभा निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
महाजन यांच्यावर पक्षाने निवडणुकीची दिलेली जबाबदारी पाहता त्यांनी त्या-त्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिले आहे. नाशिक महापालिका, लोकसभेची पालघरची पोटनिवडणूक, जळगाव, धुळे, नाशिक महापालिका, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने मिळालेला विजय. पक्षनेतृत्वाचा विश्‍वास त्यांनी सार्थ ठरविल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात यश मिळविण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर असणार आहे. 
विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी राज्यात मोठे यश मिळविण्याची जबाबदारी महाजन यांच्यावर आहे. महाजन हे जामनेर मतदारसंघातून मोकळे राहिल्यास कठीण ठरू शकतात, याचीही जाण विरोधकांना आहे. अगदी लोकसभा निवडणुकीत त्याची चुणूकही दिसून आली. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे ऐनवेळी उमेदवार दिलेला असतानाही त्यांनी कमी कालावधीत मतदारसंघात फिरून व्यवस्थित रचना करून उन्मेष पाटील यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आणले. त्यामुळे ते जामनेर मतदारसंघाबाहेर फिरल्यास विरोधकांना मोठा हादरा देऊ शकतात. त्यामुळे त्यांना ते शक्‍य होऊ नये, यासाठी जामनेर मतदारसंघात त्यांच्याविरोधात तेवढाच भक्कम उमेदवार देण्याचा यावेळी विरोधकांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 
विरोधी पक्षात हा मतदारसंघ कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी लढविणार याबाबत जागावाटपात ते निश्‍चित होईल. या मतदारसंघात दोन्ही पक्षांत इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, त्याशिवाय भक्कम उमेदवार देता येणे शक्‍य आहे का? याचीही चाचपणी विरोधी पक्षातर्फे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जामनेर मतदारसंघात विरोधक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण? याकडेच आता लक्ष देणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaom girish mahajan matdar sangh