साहित्य संमेलनातून समाजाच्या प्रश्‍नांवर चर्चा व्हावी : ना. धों. महानोर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

जळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य संमेलनांमधून केवळ साहित्यावर नव्हे, तर समाजातील प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. 

जळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य संमेलनांमधून केवळ साहित्यावर नव्हे, तर समाजातील प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्वं पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "पुलं'च्या सहवासातील स्मृतींना महानोरांनी आज "सकाळ'ला दिलेल्या भेटीत उजाळा दिला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी महानोरांशी संवाद साधला. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाला निमंत्रण नाकारल्याचा वाद चर्चेत असून, त्याबद्दल महानोरांनी बोलणे टाळले. 

समाजाचे प्रश्‍न सोडवा 
सध्या समाजात अनेक प्रश्‍न आहेत. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, ग्रामीण भागातील प्रश्‍न असे अनेक विषय समोर असताना त्यावर चर्चा होणे आवश्‍यक आहे. साहित्यिक, कवी, कलावंत, रंगकर्मी म्हणून याआधीच्या पिढीने जो विचार केला तो ही पिढी करणार आहे का? सामाजिक भान ठेवून बांधिलकी म्हणून समाजाच्या या प्रश्‍नांवर साहित्यिकांनी गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. आपले साहित्य, काव्य समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कसे सहाय्यभूत ठरेल, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी अशा साहित्य संमेलनांमधून विश्‍लेषक, समीक्षक, अभ्यासकांना बोलावून त्यावर चर्चा घडवून उत्तर शोधायला हवे, असे महानोर म्हणाले. 

खानदेशातलं वैभव कमी होतंय.
खानदेशात साहित्य-कविता, कलेचं वैभव कमी होताना दिसतंय का? या प्रश्‍नावर महानोर म्हणाले, आपल्या या प्रदेशात साहित्य-कलेची उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे. साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाईंचे आपण दाखले देतो. पण मर्ढेकरांचा जन्म फैजपूरचा. दु. आ. तिवारी इथलेच. फर्ग्युसन सोडून माधव ज्युलियन आपल्या खानदेशात राहिले. केशवसुतांनी भडगाव, फैजपुरात नोकरी केल्याचे सांगितले जाते. आपला हा प्रदेश निसर्गाची देण मोठी देण आहे. तेव्हाच्या व आताच्या रूपात फरक पडला असेल. पण, त्याचे सौंदर्य कमी झालेले नाही. हे सौंदर्य आजही शब्दांत मांडता येऊ शकते. नवीन लेखक आहेत, कवीही कविता करताहेत. परंतु, अलीकडच्या काळात साहित्यातील हे वैभव कुठेतरी कमी होतंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 
 
सांग मज विठूराया.. 

शेतकऱ्यांच्या व्यथेबद्दल महानोरांनी भरभरून लिहिलंय. त्यावर उपायही सांगितले आहेत. 
"आम्ही काय पाप केलं.. 
सांग मज विठूराया' 
असा ओव्या उद्‌धृत करत महानोरांनी शेतकरी उभा राहील, यासाठी काही सूचनाही केल्या. आमदार असताना (विधान परिषदेवर) "पाणी अडवा पाणी जिरवा'संबंधी ठराव मांडले. कामेही सुरू झाली, ती आता होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफीच्या गोष्टी होतात. मात्र, त्याला कर्जमाफी नको. त्याला ठिबकचे अनुदान वेळेत द्या, हेक्‍टरनुसार शेतात छोटा बोअर करण्यासाठी लाखभर रुपये द्या. संपूर्ण कर्ज नव्हे, व्याज माफ करा. लाख रुपये तो टप्प्याटप्प्यांत फेडेल. त्यासाठी वसुली त्रैवार्षिक करा. असंही आता अन्न कमी खाल्ले जाते, त्यामुळे फळबागांसाठी अनुदान द्या. अशा प्रयोगांमधून शेतकरी उभा राहील. 

Web Title: marathi news jalgaom sahitya samelan mahanor