महिनाभर घिरट्यांनंतर "लॅंडिंग' नाहीच! 

महिनाभर घिरट्यांनंतर "लॅंडिंग' नाहीच! 

जळगाव ः येथील विमानतळास सुरवातीपासूनच वादाची पार्श्‍वभूमीवर आहे. कर्तव्य नसताना तत्कालीन पालिकेने हा प्रकल्प हाती घेण्याचा घाट घातला. त्यातून "अटलांटा' प्रकरण घडले. विमानतळ काही झाले नाही. गैरव्यवहाराचा गुन्हा तेवढा दाखल झाला. पालिकेने "हात वर' केल्यावर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात विमानतळाची "लॉटरी' लागली. त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयासाने ते पूर्ण केले. मात्र, त्यानंतरच्या दहा वर्षांत या तळावर प्रवासी विमान काही उतरू शकले नाही. पंतप्रधानांच्या स्वप्नातील "उडान'ने या विमानतळास पंख दिले. मात्र महिनाभर अधून-मधूनच्या घिरट्यांनंतर विमानाचे "टेक ऑफ' झाले ते "लॅंडिंग' न होण्यासाठीच. आता हे विमानतळ केवळ "व्हीआयपीं'पुरते मर्यादित राहिले आहे. "त्यांनी' लक्ष दिले तरच ते पुन्हा प्रवासी म्हणून सुरू होऊ शकेल. 

ज ळगावातील विमानतळाची कहाणी जगावेगळी आहे. तत्कालीन पालिकेच्या महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये त्याचा समावेश होतो. अजिंठा मार्गावरील चिंचोली शिवारात शेकडो हेक्‍टर जागा अधिग्रहीत करून कर्तव्य नसताना पालिकेने विमानतळ विकासाचे काम हाती घेतले. त्यासाठी मक्तेदार म्हणून अटलांटा इन्फ्रास्ट्रक्‍चरकडे काम सोपविले. मक्तेदाराला कामासाठी ऍडव्हान्सही दिला. नंतर हे विमानतळ पूर्ण झालेच नाही. उलटपक्षी कामातील कथित गैरव्यवहाराने पालिकेच्या गुन्ह्यांच्या मालिकेत हे प्रकरण जाऊन बसले. 

राष्ट्रपतींमुळे उजळले नशीब 
पालिकेने विमानतळ प्रकरणी "हात वर' केल्यानंतर शासनाने हा प्रकल्प पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी विमानतळ विकासाचे काम मनावर घेतले. खानदेशकन्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होणे, या प्रकल्पाच्या पथ्थ्यावर पडले आणि विमानतळाचे नशीब उजळले. विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने त्यावेळी या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आणि चार्टर विमानापुरते मर्यादित हे विमानतळ प्रवासी विमान उतरू शकेल, या अवस्थेपर्यंत सज्ज केले. 

दहा वर्षे केवळ "शो-पीस' 
प्रतिभाताई पाटील यांच्या काळात विमानतळ पूर्णत्वास आले अन्‌ त्यांच्याच हस्ते त्याचे लोकार्पणही करण्यात आले. मात्र, त्यानंतरची दहा वर्षे या विमानतळाचा कोणताही उपयोग झाला नाही. नेते, "व्हीआयपीं'च्या दौऱ्यापुरते ते मर्यादित राहिले. चार्टर विमानाव्यतिरिक्त कोणतेही प्रवासी विमान तेथे उतरू शकले नाही. आणि तीनशे कोटींचे हे विमानतळ केवळ "शो-पीस' झाले. 

अनेकदा प्रयत्न, सर्वेक्षणही झाले 
या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने खासगी विमानसेवा कंपन्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले. त्यासाठी विमानतळावरून किती प्रवासी मिळू शकतील, याबाबतचे सर्वेक्षणही झाले. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी आदींशी या विमानसेवा कंपन्यांनी बैठका घेऊन चर्चा केली. त्यातून सेवा सुरू करण्यासंबंधी चाचपणीही झाली. मात्र, पुरेसे "पोटेंशिअल' न दिसल्याने कोणतीही खासगी कंपनी सेवा देण्यास पुढे आली नाही. 

"उडान'ने दिले पंख 
2014 मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या संकल्पनांमधील एक म्हणून "उडान' अभियान देशभर राबविण्यात आले. अगदी परवडेल अशा दरात विमान प्रवास हे सर्वसामान्यांचे स्वप्न या अभियानाचे उद्दिष्ट होते. त्यासाठी जळगाव विमानतळाची नशिबाने निवड झाली. तेव्हा पुन्हा एकदा या विमानतळाचे भाग्य उजळले, असे वाटत होते. त्या अनुषंगाने विमानतळ सज्जही करण्यात आले. 

एअर डेक्कन अन्‌ अडीच हजार 
सर्वसामान्यांना परवडेल असा जळगाव-मुंबई विमान प्रवासाचा दर केवळ बावीसशे ते अडीच हजार रुपये ठेवण्यात आला. त्यासाठी "एअर डेक्कन' या खासगी कंपनीला सेवा पुरविण्याचे काम दिले. कंपनीने मोठा गाजावाजा करत विमानसेवा सुरू केली. सेवेचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिवत उद्‌घाटनही झाले. विमानांनी काही दिवस घिरट्या घातल्या. मात्र, महिनाभर अनियमित सेवा सुरू राहिल्यानंतर ती आता कायमची बंद पडली. 

दररोज दोनशे प्रवाशांचे होते बुकिंग 
विमानसेवा सुरू असताना दररोज दोनशे प्रवासी जळगाव ते मुंबई या प्रवासासाठी तिकीट आरक्षित होते. मात्र, सेवा केवळ 19 जणांना मिळत होती. जर प्रवाशांची संख्या अधिक होती तर एअर डेक्‍कन कंपनीने मुंबईत विमान उतरविण्यासाठी स्लॉट मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. आता जरी विमानसेवा पूर्ववत सुरू झाली, तरी प्रवाशांची विमानाने प्रवास करण्यासाठी गर्दी होईल, हे नक्की! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com