शंभर कोटींच्या निधीतून रस्ते, गटारांवर भर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव ः नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेस शंभर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. या निधीतून मुख्यमंत्र्यांनी मुख्य रस्ते करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कामे सुरू होतील. यात मुख्य रस्ते, गटारी तसेच मूलभूत कामे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

जळगाव ः नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेस शंभर कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. या निधीतून मुख्यमंत्र्यांनी मुख्य रस्ते करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कामे सुरू होतील. यात मुख्य रस्ते, गटारी तसेच मूलभूत कामे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 
भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक सायंकाळी पद्मालय विश्रामगृहात झाली. बैठकीत उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, कैलास सोनवणे, धीरज सोनवणे, सुनील खडके आदींसह सर्व नगरसेवक तसेच "मनपा'चे प्रभारी शहर अभियंता डी. एस. खडके आदी उपस्थित होते. बैठकीत शंभर कोटींच्या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांबाबत चर्चा करून कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याबाबत नियोजन करण्यात आले. 

चाळीस कोटींतून मुख्य रस्ते 
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीतून आधी सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, या कामासाठी अधिक निधी लागत असल्याने चाळीस कोटींतून शहरातील मुख्य पाच रस्त्यांचे डांबरीकरण तसेच चौक सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. उर्वरित निधी इतर कामांसाठी राखीव ठेवण्यात येईल. 

पन्नास कोटींत गटारी, मूलभूत कामे 
शहरातील सर्व प्रभागांमध्ये या निधीतून विविध मूलभूत कामे केली जाणार आहेत. या कामांचे तीन दिवसांत अंदाजपत्रक सादर करण्याचीही सूचना देण्यात आले आहे. त्यानंतर विशेष महासभा घेऊन ते ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविले जाणार आहेत. 

दहा कोटी आमदार निधीसाठी 
शंभर कोटींच्या निधीतून दहा कोटींची रक्कम आमदारांच्या स्थानिक विकास निधीसाठी वापरण्यात येईल, त्यासाठी ही रक्कम राखीव असेल. या दहा कोटींच्या निधीतून प्रभागांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत. 

"अमृत'मुळे काही प्रभाग वंचित राहणार 
शंभर कोटी निधीच्या कामांमध्ये काही प्रभागांत "अमृत' योजनेंतर्गत जलवाहिनी खोदण्याचे काम तसेच भूमिगत गटार योजनेतून भूमिगत गटार तयार करण्यासाठी रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 ते 6, प्रभाग 15मध्ये पूर्ण, तर प्रभाग क्र. 13, 14, 16, 19 या प्रभागातील अर्ध्या भागात हे काम होणार नाही. परंतु अन्य मूलभूत सुविधांची कामे होऊ शकतील.

Web Title: marathi news jalgaon 100 carore nidhi road