पस्तीस वर्षांचा "बॅकलॉग' भरतोय, वर्षभरात शाश्‍वत विकास दिसेल : महापौर सीमा भोळे 

seema bhole
seema bhole

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून हुडको कर्ज, व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. वर्षभरात आम्ही त्यातून मार्ग काढण्यात यशस्वीही झालो आहोत. त्याशिवाय आम्ही शहरातील शिवाजीनगर, ममुराबाद पुलाचे काम सुरू केले आहे. पिंप्राळा पुलाचे कामही मंजूर आहे. अमृत योजनेचे काम सुरू आहे, भुयारी गटाराच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. तर रस्त्याच्या कामांना आणखी 50 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कामे सुरू असल्याने जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. मात्र, विरोधक त्याचे भांडवल करून आम्ही काहीच करीत नाही, असे दाखवीत आहे. ते जनतेची फसवणूक करीत असून कामे पूर्ण झाल्यावर जळगावकरांना वर्षभरात शाश्‍वत विकास दिसेल, अशी ग्वाही महापौर सीमा भोळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

जळगाव शहरातील रस्त्यातील खड्डे, साफसफाई तसेच हुडको कर्जफेड, गाळे प्रश्‍नावर "सकाळ'तर्फे गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक मुद्यावर सत्ताधारी व विरोधी गटाकडून चर्चाही करण्यात आली होती. याबाबत शहरातील विकासाच्या मुद्यावर महापौर सीमा भोळे यांचेही मत जाणून घेण्यात आले. 

प्रश्‍न : वर्षभरात विकासाची कामे झालीच नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे? 
महापौर : गेल्या पस्तीस वर्षांत शहराच्या विकासाचा "बॅकलॉग' आहे. रस्त्याचा प्रश्‍न अनेक वेळा भाजप विरोधात असताना उपस्थित करण्यात आला होता. हुडको कर्जाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तर सन 2012 पासून गाळ्यांचा प्रश्‍न तत्कालीन सत्ताधाऱ्यांनीच अधिक किचकट केला. आता आम्ही हे सर्व प्रश्‍न सोडवीत असून, सर्व अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच हे प्रश्‍न सुटतील. आम्ही जुन्या सत्ताधाऱ्यांच्या काळातीलच प्रश्‍न सोडवीत आहोत. आमच्या दहा महिन्याच्या काळात अद्याप एकही नवीन प्रश्‍न निर्माण झालेला नाही, आम्ही तो होऊनही दिलेला नाही. 

प्रश्‍न : शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जनता त्रस्त आहे? 
महापौर : जनतेला होत असलेल्या त्रासाची जाणीव आहेच; परंतु, शहरातील रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्‍न गेल्या पस्तीस वर्षांचा आहे. त्या काळातील सत्ताधाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिलेले नाही. तसेच शहरातील पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनीही टाकल्या नाहीत. त्यामुळे अनेकवेळा त्या फुटत असतात. आता "अमृत' योजनेच्या माध्यमातून जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील 50 वर्षांत नागरिकांना 24 तास पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल. त्यामुळे शहरात रस्त्याच्या खड्ड्यांची समस्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 50 कोटींचा निधी मंजूर केला. लवकरच त्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे जळगावकरांना वर्षभरात खड्डेविरहीत रस्ते दिसून येतील. 

प्रश्‍न : हुडकोचे कर्ज, गाळ्यांचा प्रश्‍न सुटणार कधी? 
महापौर : हुडकोच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुंबईत बैठका घेण्यात येत आहेत. 467 कोटी रुपयांची थकबाकी आता 250 कोटी रुपयांवर आली आहे. लवकरच त्यावर निर्णय होऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता आहे. तर गाळे प्रश्‍नावरही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. गाळेधारकांशी चर्चा सुरू असून, विरोधकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. 

प्रश्‍न : कोटी-कोटीच्या निधीची घोषणा होतेय, कामे कधी होणार? 
महापौर : गेल्या पस्तीस वर्षांच्या काळात जळगाव शहराला कधीही विकासाचा निधी मिळालेला नाही. परंतु, महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री, गिरीश महाजन यांनी जनतेला निवडणुकीत आश्‍वासन दिल्याप्रमाणे अगोदर 25 कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून कामे सुरू करण्यात आली. आता शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील 50 कोटीला मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 50 कोटी लवकरच प्राप्त होईल. एमआयडीसीच्या विकासासाठी 28 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याशिवाय शिवाजीनगर पूल, पिंप्राळा पुलासाठीही निधी मंजूर केला आहे. तर समांतर रस्त्याच्या कामाचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्र्याच्या हस्ते 8 ऑगस्टला भूमिपूजन 
महापौर म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने जळगावच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा अध्यादेशही लवकरच निघणार आहे. मुख्यमंत्री 8 ऑगस्टला जळगावला येत आहे. त्यांच्याहस्ते शहरातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येईल. 

टीका नव्हे चर्चा करावी : आमदार भोळे 
शहराच्या विकासकामांबाबत आमदार सुरेश भोळे म्हणाले, शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राज्यातील शासनाच्या माध्यमातून महापालिकेला वर्षभरात मोठा निधी मिळाला आहे. अमृत योजनेचे कामही सुरू आहे. भुयारी गटाराच्या निविदा मंजूर झाल्यानंतर त्याचे कामही सुरू करण्यात येईल. सफाई मक्ता देण्यात आला असून, त्याचे कामही दोन दिवसांत सुरू होईल. मात्र विरोधक उगाचच आमच्यावर टीका करीत आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य करावे आणि जर विकासावर चर्चा करायचीच असेल तर खुली चर्चा करावी, आम्ही त्यासाठी तयार आहोत. अगदी कुणालाही शंका असेल आपण केव्हाही चर्चा करण्यात तयार आहोत. आपण सर्व मिळून जळगावचा विकास करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com