तरसोद ते फागणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू 

तरसोद ते फागणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू 

जळगाव : तरसोद ते फागणेपर्यंतच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंशतः सुरू करण्यात आले आहे. सुमारे शंभर मजूर या कामावर तूर्त काम करीत आहेत. संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराचे "फायनान्शिअल क्‍लोजर' बाकी होते. ते आता पूर्ण झाले असून, त्यास काम सुरू करण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. 
फागणे ते तरसोदपर्यंतच्या टप्प्यातील 87 किलोमीटरचे काम "एमबीएल इन्फ्रा' या मक्तेदार कंपनीला दिलेले असून, वर्षभरापूर्वी या कामाची सुरवात झाली. मधल्या काळात हे काम निधीअभावी बंद पडले होते. तरसोद ते चिखली दरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या ऑक्‍टोबरपासून वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्तेही तयार झाले आहेत. मात्र, तरसोद ते फागणेदरम्यानचे काम आठ ते दहा महिन्यांपूर्वी सुरू होऊन ते नंतर बंद पडले. संबंधित कंत्राटदार कंपनीने "फायनान्शिअल क्‍लोजर' न केल्याने बॅंकेने कर्जपुरवठा बंद केला. आता मात्र कर्ज देणे सुरू झाल्याने कामाला अंशतः सुरवात झाली आहे. केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरींचे ओएसडी सुधीर देऊळगावकर यांनी यासाठी बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. त्याच्या अंमलबजावणीस तब्बल दोन महिने लागले आहेत. 

एरंडोल परिसरात काम सुरू 
तरसोद ते फागणेपर्यंतच्या टप्प्यांतर्गत एरंडोल परिसरातील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. अभियंत्यासह सुमारे शंभर मजूर तेथे काम करीत आहेत. दहा महिन्यांपूर्वी जे काम झाले त्या बऱ्याच ठिकाणी धूळ, केरकचरा साचला आहे. अनेक ठिकाणी झुडपे उगवली आहेत. ते बुलडोझरने स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच रस्त्यासाठी लागणारा मुरुम, खडी, आसारी, सिमेंट, वाळू आदींची जमवाजमव पूर्ण झाली आहे. 

तरसोद ते फागणेदरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला एरंडोलपासून सुरवात झाली आहे. सुमारे शंभर मजूर तेथे कार्यरत आहेत. इतर ठिकाणची कामेही लवकरच सुरू होतील. 
- दुर्गेश वाणी, निरीक्षक, "एमबीएल इन्फ्रा' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com