निधीअभावी चौपदरीकरणास "ब्रेक' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स' थांबल्याने फागणे- तरसोद टप्प्याचे काम पूर्णपणे बंद आहे, तर तरसोद- चिखली टप्प्यातील कामाला हवी तशी गती नाही. त्यामुळे सर्वसामान्य जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या कामांच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली प्रचंड वाहतूक आणि अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर धुळे- जळगाव टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली अशा दोन टप्प्यात जवळपास 150 किलोमीटरचे हे काम प्रस्तावित आहे. गेल्या सहा- आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया मंजुरी, कार्यादेश देऊनही या कामाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झालेली नाही. 

काम सुरू, पण पुन्हा ब्रेक 
सहा महिन्यांपासून दोन्ही टप्प्यातील काम वेगात सुरू झाले. फागणे ते तरसोदपर्यंतच्या टप्प्यातील कामाने वेग घेतला असताना तरसोद- चिखली काम सुरू झाले नव्हते. नंतर मात्र, तरसोद- चिखली काम वेगाने सुरू झाले आणि दोघा कामांची स्पर्धा होऊ लागलेली असताना आता बॅंकांनी निधी पुरवठ्यात हात आखडता घेतल्याने या कामांना ब्रेक लागला आहे. फागणे ते तरसोदचे काम एमबीएल ऍग्रो मक्तेदार कंपनी करीत असून, गेल्या महिन्यापासून या कामास "ब्रेक' लागला आहे. 940 कोटी खर्चाच्या या कामास मक्तेदारास बॅंकेकडून होणारा पतपुरवठा थांबल्याने कामही थांबले आहे. 

तरसोद- चिखली कामाची संथगती 
त्या तुलनेत तरसोद ते चिखली या टप्प्यातील 948 कोटींच्या कामाची प्रगती चांगली आहे. तरसोदपासून थेट मुक्ताईनगरपर्यंत हे काम ठिकठिकाणी सुरू असल्याचे दिसते. मात्र, कामास हवा तसा वेग नसल्याने या कामाच्या पूर्णत्वाबाबत शंका उपस्थित होत आहे. हे काम वेल्स्पन कंपनीने घेतले असून, कंपनी मोठी असल्याने निधीची अडचण या एजन्सीला येणार नाही, असे बोलले जाते. मात्र, तरीही या कामाला गती देण्याची गरज आहे. 
 
काय आहे "हायब्रीड इम्युनिटी' 
ही दोन्हीही कामे "हायब्रीड इम्युनिटी' मोडची असून, त्यात 40 टक्के निधी केंद्र सरकार या कामांसाठी देणार आहे व उर्वरित निधी मक्तेदार कंपनीला उभा करायचा आहे. याअंतर्गत मक्तेदार एजन्सीने 20 टक्के काम पूर्ण केल्यानंतर केंद्राकडून 8 टक्के निधी दिला जातो, असा प्रत्येकी 20 टक्‍के कामाच्या पाच टप्प्यात 40 टक्के निधी दिला जाणार आहे. प्रत्यक्षात या दोन्ही टप्प्यांमध्ये केवळ सपाटीकरणाचे काम सुरू असून, ते पाच टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मक्तेदार एजन्सीला स्वनिधी किंवा बॅंकांच्या अर्थसाहाय्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. 
 
बुधवारी नागपुरात बैठक 
महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व जळगाव शहरातील समांतर रस्त्यांच्या कामासंदर्भात बुधवारी (ता.17) नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. खासदार ए. टी. पाटील यांच्यासह "न्हाई'चे अधिकारी बैठकीस उपस्थित राहतील. 

Web Title: marathi news jalgaon 4 way road