Loksabha 2019 : सहा नद्यांचा स्पर्श, पण तालुका तहानलेलाच! 

Loksabha 2019 : सहा नद्यांचा स्पर्श, पण तालुका तहानलेलाच! 

पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले व धरणांना पुनरुज्जीवन करून ‘हरितक्रांती’चे स्वप्न साकारले जावे, अशी अपेक्षा शेतकरी व व्यावसायिकांकडून होत आहे. 

पाचोरा तालुका तसा भौगोलिकदृष्ट्या संपन्न मानला जातो. सुमारे पावणेतीन लाख लोकसंख्येच्या या तालुक्याला १२८ गावे जोडली असून, त्यांचे सहा महसुली विभागांत विभाजन करण्यात आले आहे. कापूस, ऊस व मका ही या तालुक्याची पारंपरिक पिके आहेत. कारण, या तालुक्याला ‘गिरणा’, ‘हिवरा’, ‘बहुळा’, ‘अग्नावती’, ‘गडद’ व ‘तितूर’ या सहा नद्यांचा किनारा लाभला आहे. या नदीकिनाऱ्याचा परिसरही नेहमी हिरवा व संपन्न दिसत नाही. सरासरी पर्जन्यमान दरवर्षी खालावत असल्याने धरणांमधील जलसाठा कमी झाला आहे. परिणामी, विहिरींची पातळी कमालीची खालावली आहे. 
तालुक्यातील ऊस व कापसाचे उत्पादन पाहता, सूतगिरणी व खासगी साखर कारखाना सुरू करण्यात आला. काही वर्षे सूतगिरणी चालली. मात्र, साखर कारखान्याला पहिल्या वर्षापासून लागलेली घरघर आजतागायत कायम आहे. नगरदेवळा येथील सूतगिरणीचा परिसर जणू काही वाळवंटच बनला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग मंडळाचा खत कारखाना पाचोरा येथे आहे. पन्नास वर्षांपूर्वी कृषी संशोधन व विकास महामंडळाने गिरड रस्त्यावर सुमारे सव्वाशे एकर जमीन घेऊन तेथे कृषी संशोधन व विकास केंद्र सुरू केले. या केंद्राला जगभरातील नामवंत कृषितज्ज्ञ व संशोधकांनी भेटी दिल्याचा आदर्श इतिहास आहे. या संशोधन केंद्रात तयार करण्यात आलेली शेतीची अवजारे देशभरात आदर्शवत ठरली होती. सद्यःस्थितीत या केंद्रात आता कोणत्याही प्रकारची कार्यप्रणाली होताना दिसत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रात अग्रणी असलेला हा तालुका सध्या या प्रचंड पिछाडीवर गेला आहे. या सर्व घटनांना प्रमुख कारण पाणी हेच आहे. तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा इतिहास पाहता, दरवर्षी पर्जन्यमान खालावत असल्याचे चित्र आहे. पाऊस नसल्याने खरीप व त्यापाठोपाठ रब्बीचेही नुकसान होत असल्याने कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. निर्मल उद्योगसमूह काही प्रमाणात शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला असला, तरी पाणीप्रश्न मात्र या आशेवर ‘पाणी’ फिरवणारा ठरला आहे. तालुक्यातील ‘बहुळा’, ‘हिवरा’ व ‘अग्नावती’ हे मोठे सिंचन प्रकल्प ‘हरितक्रांती’च्या उद्देशाने उभारण्यात आले. मात्र, अनेक वर्षांपासून या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारणीवेळी जी गावे लाभार्थी म्हणून गणली गेली, त्या गावांना अद्याप या धरणांच्या कालव्याचे पाणी पोहोचलेले दिसत नाही. अनेकदा मागणी करूनही कालव्यांची कामे होत नसल्याने सिंचन प्रकल्प उभारणीचा उद्देशच अपयशी ठरला असल्याचे चित्र आहे. 
तालुक्यातील कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता आठ- दहा वर्षांपूर्वी येथे १३ जिनिंग उभारण्यात आल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या जिनिंगमध्ये कापूसच आला नाही. त्यामुळे जिनिंगमालकांनी कापसाऐवजी मका व्यवसाय सुरू केला आहे. अत्यल्प पाऊस, पावसाअभावी रोगराईच्या आहारी जाणारे कापसाचे पीक, महागड्या जंतुनाशकांची फवारणी यांमुळे कपाशी लागवड कमी होऊन मक्याचे उत्पादन घेण्याची मनोवृत्ती वाढली आहे. 
सद्यःस्थितीत हिवरा धरणात दहा टक्के जलसाठा आहे; परंतु ‘बहुळा’ आणि ‘अग्नावती’ या सिंचन प्रकल्पातील मृतसाठ्यानेही आता तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट होत आहे. काही वर्षांपूर्वी बहुळा धरणाचे पाणी जळगावकरांसाठी देण्यात आले होते. त्याअनुषंगाने या धरणातून पाचोरा पालिकेनेही पाणीपुरवठा योजना पूर्ण केली; परंतु धरणच तहानलेले असल्याने या योजनांवर ‘पाणी’ फिरले आहे. परिणामी, तालुक्यातील भूजलपातळी कमालीची खालावली आहे. चारशे फुटांपर्यंत कूपनलिका करूनही पाणी लागत नाही. त्यामुळे पाणी देऊनही पिके जगवणे शक्य होत नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून ही स्थिती असल्याने शेती लागवडीचे क्षेत्र खालावत असल्याची गंभीर व भीतिदायक स्थिती तालुक्यात आहे. मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव हरेश्वर परिसरात पाण्याअभावी मोसंबी बागा दिसेनाशा झाल्या आहेत. 
टंचाई निवारणार्थ कायमस्वरूपी उपाययोजना केल्याच जात नाही. नदीजोड प्रकल्पांतर्गत उतावळी- बहुळा नदीजोडचे काम केवळ २० टक्के बाकी असतानाही चार वर्षांपासून ते पूर्ण होत नाही. हे काम पूर्णत्वास आले, तर बहुळा धरण बारमाही भरलेले राहील, अशी स्थिती आहे; परंतु राजकीय विरोध व अनास्थेमुळे शेती, शेतकरी व पशुधनमालकांना फटका सोसावा लागत आहे. ‘नदीजोड’अंतर्गत ‘तापी’ अथवा इतर नद्या व धरणांचे पाणी या तालुक्यात वळवणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे रोजगार मिळायला तयार नाही. रोजगारासाठीच्या कोणत्याही संधी वाढीस लागत नाहीत. औद्योगिक वसाहतीचा विकास होत नसल्याने तालुक्यातील आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. तालुक्याला गतकाळात असलेले ‘अच्छे दिन’ दिवसागणिक ‘बुरे’ होत असल्याने सारेच हवालदिल होत आहेत. एकूणच या परिस्थितीचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना राबवून तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com