विजयादशमीच्या मुहूर्तावर 62 कोटींची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जळगाव ः साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्त साधत अनेकांनी सोने, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वापरावयाच्या वस्तू, तयार कपडे खरेदी केले. सर्वाधिक उलाढाल सोने- चांदी बाजारपेठेत झाली आहे. वाहने, कपडे, वस्तू मिळून साठ कोटींची उलाढाल झाली. यासोबतच अनेकांनी ऑनलाइन शॉपींगलाही पसंती दिली. दरम्यान शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी सोने, चांदी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. 

जळगाव ः साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्त साधत अनेकांनी सोने, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वापरावयाच्या वस्तू, तयार कपडे खरेदी केले. सर्वाधिक उलाढाल सोने- चांदी बाजारपेठेत झाली आहे. वाहने, कपडे, वस्तू मिळून साठ कोटींची उलाढाल झाली. यासोबतच अनेकांनी ऑनलाइन शॉपींगलाही पसंती दिली. दरम्यान शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी सोने, चांदी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. 

यंदा मंदीचे सावट असले, तरी केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे झालेले वेतन, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस यावर या कर्मचाऱ्यांचा दसरा चांगला गेला. अनेकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला काहींनी दुचाकी, चारचाकी वाहने घेतली. तर काहींनी नवीन घरात गृहप्रवेश केला. विजया दशमीला नवीन कपडे घेण्याची परंपराही कायम राहिली. शहरातील प्रमुख फुले मार्केट, मानसिंग मार्केट, दाणा बाजार, गांधी मार्केट, सराफ बाजार या बाजारपेठांमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी होती. 

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मिक्‍सर, कुकर, पंखे, होम थिएटर आदी वस्तूंना मागणी होती. दुचाकी वाहनांमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांनी पसंती दिली होती. दुचाकी खरेदीसाठी हिरो मोटोकॉप, होंडा, यामाहा, सुझुकी, बजाज, टीव्हीएस आदी कंपन्यांची वाहने खरेदी झाली. पगारिया ऑटो, राम होंडा, टीव्हीएस, जागृती मोटर्स (ई बाईक), सातपुडा ऑटोमोबाईल, आदित्य होंडा, मानराज मोटर्स आदी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरूम मध्ये गर्दी झाली होती. 

आकडे बोलतात.. 
बाजारपेठ प्रकार---उलाढाल 
सोने--15 कोटी 
इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व कपडे--5 कोटी 
दुचाकी--1500(वाहने)----11 कोटी 
चारचाकी--250 (वाहने)--30 कोटी 

 
सोने खरेदीस चांगली गर्दी होती. मात्र शेतकरी वर्ग खरेदीस हवा तसा बाहेर पडला नाही. अजून खरिपाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले नाही. दिवाळीत शेतकरी खरेदी करतील. भावातील चढउतारामुळे हवी तशी गर्दी झाली नाही. सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी होती. 
-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी आर.सी.बाफना ज्वेलर्स, जळगाव 
 
बांधकाम क्षेत्रात नोटाबंदीनंतर पहिल्यांदा विजयादशमीला नवीन घरांना मागणी होती. दिवाळीतही अनेक नागरिक स्वतःची घरे घेतील. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाहीही सुरू केली आहे. विजया दशमीच्या मुहूर्ताला सुमारे एक हजार नागरिकांनी नवीन घरात प्रवेश केल्याचा अंदाज आहे. आमच्याकडे डुप्लेक्‍स बंगल्यांना मागणी वाढली आहे. 
-विलास यशवंते, बांधकाम व्यावसायिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 62 carrore dasara