आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेप

आदेशबाबाला मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव ः येथील समतानगरातील आठवर्षीय बालिकेचे अपहरण करून खून केल्याची घटना 13 जून 2018 ला उघडकीस आली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल अपहरण, बलात्कार करून खून केल्याच्या गुन्ह्यात आज प्रधान न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयाने संशयितास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाने फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न केले; मात्र निकाल देताना न्यायालयाने ती मागणी अमान्य करीत सर्व कलमांद्वारे दोषी ठरल्याने संशयित आदेशबाबा ऊर्फ आनंदा साळुंखे यास वेगवेगळ्या तीन कलमांत स्वतंत्र जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बाललैंगिक अत्याचार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात सश्रम कारावास अशा पाचही कलमांत एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये दंड आकारण्यात आला. 

अशी घटना-असा गुन्हा 
समतानगरातील धामणगाववाड्यातील महिलेची आठवर्षीय मुलगी अलका (काल्पनिक नाव) दादीकडे जाते, असे सांगून मंगळवारी (12 जून 2018) सायंकाळी घरातून गेली होती. दोन तास होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने तिच्या शोधार्थ सासूचे घर गाठत विचारणा केली. मात्र, तिथे ती पोहोचलीच नाही. नणंदेकडे शोध घेतल्यानंतर मुलगी तेथेही नव्हती. परिणामी भेदरलेल्या कुटुंबीयांनी मुलीचा शोधाशोध करून पोलिस ठाणे गाठले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरातील महिला कोल्हे हिल्सजवळील टेकडीवर शौचास गेल्या असताना मोकाट कुत्रे एका गोणीला ओढत असल्याचे महिलांनी बघितले. जवळ जाऊन खात्री केल्यावर लहान मुलीचा पाय दिसल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बापू रोहोम, "डीवायएसपी' सचिन सांगळे तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यावर गोणीतील मृतदेह पीडिता अलकाचा असल्याचे निष्पन्न झाले. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात दोषारोप दाखल केल्यावर सरकार पक्षातर्फे ऍड. केतन ढाके, फिर्यादीतर्फे ऍड. एस. के.कौल, विधिसेवातर्फे ऍड. विजय दर्जी यांनी काम पाहिले. फास्ट ट्रॅक पद्धतीने चाललेल्या या खटल्याचे कामकाज 26 तारखांमध्ये पूर्ण होऊन 25 मार्चला संशयित आदेशबाबा ऊर्फ आनंदा साळुंखे यास न्यायालयाने दोषी ठरवून आज न्या. गोविंदा सानप यांच्या न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

अशी कलमे-अशी शिक्षा 
- कलम 363 : कायदेशीर रखवालीतून अपहरण : 4 वर्षे सश्रम कारावास, 25 हजार दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद 
- कलम -376 (3) : बलात्कार : मरेपर्यंत जन्मठेप, 35 हजार दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद 
- उपकलम (अ) : अत्याचार करून मारून टाकणे ः मरेपर्यंत जन्मठेप, 25 हजार रुपये दंड व दंड भरल्यास 2 महिने साधी कैद 
-कलम ः 302 ः खून ः जन्मठेप, 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद 
- कलम : 201 : पुरावे नष्ट करणे : 5 वर्षे सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद 
- बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-2012 (पोक्‍सो)(6) : 10 वर्षे सश्रम कारावास, 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद 
* सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. 
एकूण दंडाची रक्कम ः एक लाख 35 हजार रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com