मराठवाड्याच्या हिसक्‍याला दाखविला खानदेशी ठसका!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

जळगाव ः "खानदेशी ठसका' भल्या-भल्यांना उमजू देत नाही, असे बोलले जाते. राजकारणातही आता त्याचा प्रत्यय दिसून आला. जळगाव महापालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या यशासाठी मराठवाड्यातील जालन्याचे आमदार अब्दुल सत्तार जोशात येथे आले. मात्र, अंतर्गत राजकारणातील स्थानिक नेत्यांनी त्यांच्या हिसक्‍याला तेवढ्याच ठसक्‍यात उत्तर देत "शह' दिल्याचे सांगितले जात आहे. 

जळगाव ः "खानदेशी ठसका' भल्या-भल्यांना उमजू देत नाही, असे बोलले जाते. राजकारणातही आता त्याचा प्रत्यय दिसून आला. जळगाव महापालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या यशासाठी मराठवाड्यातील जालन्याचे आमदार अब्दुल सत्तार जोशात येथे आले. मात्र, अंतर्गत राजकारणातील स्थानिक नेत्यांनी त्यांच्या हिसक्‍याला तेवढ्याच ठसक्‍यात उत्तर देत "शह' दिल्याचे सांगितले जात आहे. 
जळगाव पालिकेत गेल्या 25 वर्षांपासून कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. अगदी केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नाही. आता विरोधी पक्षात असताना कॉंग्रेसच्या नेत्यांचे डोळे उघडले. महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नियोजनाची सभा घेत नाही; परंतु जळगावात प्रथमच अशोक चव्हाण यांनी नियोजनाची सभाही घेतली. त्यांनी जळगावच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र प्रभारी म्हणून आमदार सत्तार यांची नियुक्तीही केली. त्यानुसार सत्तार जळगावात आले, कार्यकर्त्यांच्या पहिल्याच सभेत त्यांनी सर्वांना जिंकून घेतले. नेता म्हणून व्यासपीठावर बसायचे असेल, तर अगोदर नगरसेवक निवडून आणा, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे मराठवाड्याच्या या हिसक्‍याने स्थानिक नेते हबकले तर नवल नाही. 
मराठवाड्यातून आलेल्या या नेत्याच्या तंत्रामुळे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत घबराट निर्माण झाली. जळगावच्या निवडणुकीतील रणांगणाची जाण असलेल्या स्थानिक नेत्यांना आपल्या घरातील उमेदवार उतरविणे तर शक्‍य नव्हतेच. परंतु उमेदवाराचे नाव सुचवून जबाबदारी घेणेही तेवढे सोपे नव्हते. त्यामुळे "नागपूर' येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आपणच नातेवाइक उतरविल्यास चुकीचा संदेश जाईल, असा घोषा लावला अन्‌ प्रदेशाध्यक्षांनीही त्याला सहमती दिली अन्‌ स्थानिक नेत्यांनी घरचा उमेदवार देण्याची मूठ सोडवून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार सत्तार यांना पहिला "ठसका' त्यांनी दाखविला. त्यानंतर या नेत्यांनी उमेदवारीसाठी कोणाचेही नाव सुचविले नाही, राष्ट्रवादीशी चर्चावर चर्चा केली मात्र दिले केवळ सतरा उमेदवार. 
स्थानिक नेत्यांनी घरचे उमेदवार द्यावेत, यासाठी सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडूनही सहमती मिळविली होती. विशेष म्हणजे नेते सुचवतील त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व जबाबदारी स्वीकारण्याचीही त्यांची तयारी होती. मात्र, स्थानिक नेत्यांनी हा विषय अलगद बाजूला केल्यामुळे आमदार सत्तार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील खानदेशी नेत्यांच्या पहिल्या ठसक्‍यातच गारद झालेले आमदार सत्तार तेवढ्याच जोमाने प्रचारासाठी येणार काय? आणि त्यांना स्थानिक नेते साथ देणार काय? याचीच प्रतिक्षा आहे. त्यावरच कॉंग्रेस यावेळी भोपळा फोडणार काय? हे अवंलबून आहे.

Web Title: marathi news jalgaon abdul sattar khandeshi thaska