अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारा देवदूत 

राजू भाटिया
राजू भाटिया

जळगाव: एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया अशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी हजारपेक्षा अधिक अपघातग्रस्तांना जीवनदान दिले असल्याने मदतीसाठी धावून येणारा देवदूत अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. 

निमगव्हाण (ता. चोपडा) या छोट्याशा गावातील राजेंद्र कस्तुरचंड भाटिया हे शेतीकरुन आपला उदरनिर्वाह चालवितात. आपण समाजाचे काही देणे लागतो, "सेवाभाव परमो धर्म' या उक्तीनुसार अडीअडचणीत किंवा अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यावा या आईवडिलांच्या शिकवणीतून राजेंद्र भाटिया वयाच्या 19 वर्षांपासून आजतागायत अपघातग्रस्तांची मदत करीत आहेत. चोपडा, अडावद यासह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात झाल्याचे कळताच राजेंद्र पाटील हे आपल्या हातातील काम सोडून त्या अपघातग्रस्ताची मदत करण्यासाठी जातात. आतापर्यंत राजेंद्र भाटिया यांनी अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे हजारपेक्षा अधिक अपघातग्रस्तांना जीवदान मिळाल्याने त्यांच्यासाठी ते देवदूतच ठरले आहेत. 

बेवारसांच्या अंत्यदर्शनासाठी साहित्य 
चोपडा उपजिल्हा रुग्णालयात अनेक बेवारस मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आलेले असतात. राजेंद्र भाटिया हे गेल्या अनेक वर्षांपासून या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्य आणून देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्वखर्चाने रुग्णावर उपचार 
चोपड्यासह आजूबाजूच्या गावांमध्ये अपघात किंवा कोणतीही घटना घडल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न करता राजेंद्र भाटिया हे त्यांच्या मदतीसाठी धावून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करतात. अनेकदा काही रुग्णांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात देखील दाखल केले असून रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास त्यांनी गावकऱ्यांसह मित्रमंडळींच्या मदतीने रुग्णालयाचा खर्च देखील केलेला आहे. 

रोज सहा तास रुग्ण सेवेसाठी 
चोपडा तालुक्‍यात अनेक आदिवासी पाड्यासह अनेक दुर्गम भाग आहे. त्याठिकाणी वैद्यकीय यंत्रणा अत्यंत तोकडी असल्याने या ठिकाणांवरील नागरिक मदतीसाठी राजेंद्र भाटिया यांना फोन करीत असल्याने श्री. भाटिया देखील त्यांना मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. तसेच दिवसातील सहा तास भाटिया हे रुग्णांच्या सेवेसाठी देत असतात. रुग्णांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या भाटिया यांना त्यांचे मोठे भाऊ धनाजी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिसांकडून मिळतेय सहकार्य 
अनेक नागरिकांना पोलिस ठाण्यासह कोर्ट कचेरीच्या चकरा मारव्या लागतील यामुळे अपघात ग्रस्तांची मदत करण्याचे टाळत असतात. परंतु राजेंद्र भाटिया यांनी अनेक अपघातग्रस्तांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना नेहमीच सहकार्य मिळत असल्याने नागरिकांनी देखील पोलिसांना न घाबरता अपघातग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन केले. 
 
पूर्वी अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जायची. परंतु नागरिकांनी आपल्या मनातील ही भीती दूर करून अपघात ग्रस्ताचे फोटो काढत बसण्यापेक्षा त्याला तत्काळ रुग्णालयात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यावेळी जाती धर्माचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाळावा. 
-राजेंद्र भाटिया 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com