विमानाने घातल्या 35 मिनिटे घिरट्या 

विमानाने घातल्या 35 मिनिटे घिरट्या 

जळगाव ः मुंबई ते जळगाव असा प्रवास करणाऱ्या 32 प्रवाशांना तब्बल 35 मिनिटे आकाशातच विमानासोबत घिरट्या घालत राहण्याची वेळ आली. शहरात शनिवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वैमानिकाने खाली उतरण्यासाठी योग्य वातावरण मिळेल, या आशेने चक्क 35 मिनिटे आकाशात घिरट्या घातल्या. मात्र, विमानतळावर नाइट लॅंडिंगची सोय नसल्याने मुंबईहून आलेले विमान थेट अहमदाबादला न्यावे लागले. जळगावला उतरणाऱ्या 32 प्रवाशांच्या जीव मात्र टांगणीला लागला होता. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत काम करणारे के. एन. पाटील, कल्पना पाटील यांनी गेल्या शनिवारी (ता.14) मुंबई ते जळगाव असे ट्रू-जेट विमानाचे तिकीट काढले होते. ते मुंबई विमानतळावरून विमानात बसले. विमानात 32 प्रवासी होते. दुपारी साडेचारला विमानाने जळगावकडे प्रयाण केले. सायंकाळी साडेपाच ते पावणे सहादरम्यान विमान जळगाव विमानतळाजवळ पोचले. मात्र, सायंकाळी पाऊस सुरू होता, ढगाळ वातावरण होते. यामुळे विमानतळावर लॅंडिंग होण्यात अडचणी येत होत्या. तब्बल 35 मिनिटे वैमानिकाने विमान हवेतच घिरट्या घालत ठेवले. शेवटी ते विमान अहमदाबादला नेण्याचा निर्णय झाला. 

जळगावचे प्रवासी थेट अहमदाबादला 
श्री. पाटील यांच्यासह सर्व प्रवाशांना घेऊन विमान अहमदाबादकडे रवाना झाले. तेथे विमानतळावर ट्रू-जेट कंपनीतर्फे ज्या प्रवाशांना मुंबईला जायचे होते, त्यांना मुंबईला जाणाऱ्या विमानाने पाठविण्यात आले. 21 प्रवाशांना मात्र जळगावलाच उतरायचे असल्याने त्यांची रात्री राहणे, भोजनाची सोय ट्रू-जेट कंपनीतर्फे थ्री स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली. सकाळी पुन्हा नाश्‍तानंतर हॉटेल ते विमानतळ मोफत बसने नेण्यात आले. अहमदाबाद ते जळगाव विमानाने त्यांना दुसऱ्या दिवशी जळगावला आणण्यात आले. यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर परत जळगावला आल्याचा आनंद झाला. श्री. पाटील यांनी सांगितले, की विमान उतरविण्यास रात्री वातावरण नव्हते, त्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. ट्रू-जेट कंपनीने सर्व प्रवाशांची सोय चांगली ठेवत सकाळी परत जळगावला आणून सोडले. 

प्रवाशांचा संताप 
मुंबईचे काही प्रवासी कामानिमित्त जळगावात उतरून, पुन्हा रात्री ट्रेनने जळगावहून मुंबईला जाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे पायलटने अहमदाबादला नेल्याने मुंबईच्या प्रवाशांनी ट्रू-जेट प्रशासनावर संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाशांना ट्रू-जेटच्या अधिकाऱ्यांनी अहमदाबादहून रात्री नऊच्या विमानाने परत मुंबईला पाठविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com