ही कसली रीत...विमानाला विलंब चालतो, प्रवाशांना  "नो एन्ट्री' 

ही कसली रीत...विमानाला विलंब चालतो, प्रवाशांना  "नो एन्ट्री' 

जळगाव : मुंबईला जाणाऱ्या विमानाला ठराविक वेळेपेक्षा दीड तास उशीर झाला. दरम्यान, याच विमानाने प्रवास करणारे कुटुंब विमानतळावर क्षणभर उशिरा पोचले. मात्र, त्यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांचा मुंबई प्रवास तर हुकलाच शिवाय, तेथील कामांचे नियोजनही बोंबलले. विमानास दीड तास विलंब झाला तर चालतो, मग प्रवासी एक-दोन मिनीट उशिरा पोचले तर का चालत नाही? असा संतप्त सवाल या प्रवाशाने उपस्थित केला आहे. 
आजच नव्हे तर जळगाव- अहमदाबाद व जळगाव- मुंबई अशी सेवा देणाऱ्या ट्रू- जेट कंपनीच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आता नियमितपणे येऊ लागला असून, प्रवासी त्यामुळे संतप्त आहेत. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे काही प्रवाशांनी बोलून दाखविले. 

व्यावसायिकाचा कटू अनुभव 
जळगावातील व्यावसायिक धवल टेकवानी यांनी त्यांची पत्नी पूजा व दोन वर्षीय मुलगा अयांश अशा तिघांचे जळगाव- मुंबई असे ट्रू- जेटच्या विमानसेवेसाठी 6 नोव्हेंबरचे बुकिंग केले होते. नियोजित वेळेनुसार आज त्यांचे विमान जळगाव विमानतळावरुन सकाळी 10.45 वाजता उड्डाण घेणार होते. ही सेवा आधीच विस्कळित झालेली असताना श्री. टेकवानी यांना मंगळवारी सायंकाळी विमान दीड तास लेट राहील, असा मेसेज मोबाईलवर आला. त्यानुसार 10.45चे विमान 12.25 ला उड्डाण घेणार होते. उड्डाणाच्या किमान 45 मिनिटे आधी विमानतळावर पोचणे अनिवार्य असते. त्यानुसार श्री. टेकवानी कुटुंब 11.40 वाजता पोचणे अपेक्षित असताना ते दोन-तीन मिनिटे उशिरा पोचले. 

प्रवेश नाकारला 
या एकमेव कारणाने टेकवानी कुटुंबास विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यासंदर्भात त्यांनी तातडीने विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी सुनील यांच्याशी संपर्क केला. त्यांनी विमानतळावर सेवेत असलेल्या प्राधिकाऱ्यांना सूचित केले, त्यानंतरही टेकवानी कुटुंबास परवानगी दिली गेली नाही. मुंबईत दोनची महत्त्वपूर्ण अपॉइंटमेंट असताना श्री. टेकवानी यांचा मुंबई दौराच ऐनवेळी अशा गलथान कारभाराने रद्द झाला आणि त्यांची ही कामे ठप्प झाली. 

कशी चालेल विमानसेवा? 
जळगावहून विमानसेवा सुरू होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. प्रवाशांची उपलब्धता, अन्य तांत्रिक बाबी यावर तोडगा काढत ही सेवा कशीबशी सुरू झाली. प्रवासी कमी व्हायला नको, म्हणून काही उद्योजक- व्यावसायिक अन्य पर्याय टाळत विमानसेवेला प्राधान्य देत असताना त्यांना असा अनुभव आल्यानंतर त्यांनी काय करावे? त्यामुळे ज्यांच्या भरवशावर ही सेवा सुरू झाली, तेच नाराज झाले तर सेवा कशी चालेल? हा प्रश्‍नच आहे. 

अहमदाबादची फेरीही झाली रद्द 
श्री. टेकवानी यांच्या नातलगाचे 4 नोव्हेंबरचे अहमदाबादसाठीचे बुकिंग होते. मात्र, ऐनवेळी 4 तारखेची ती फेरी रद्द झाली. ती फेरी आज 6 तारखेला होती. केवळ या एक-दोन दिवसांतच नव्हे तर विमानसेवा सुरू झाल्यापासून असा अनियमित फेऱ्यांचा अनुभव प्रवाशांना येतोय, त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com