सलून व्यवसायाला परवानगी द्या... नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

विवंचनेत व्यावसायिक आहेत. त्यामुळे समाजाला कायद्याच्या बंधनात राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत प्रशासन घालून देत असलेल्या नियमांच्या चौकटीत राहून आम्ही व्यवसाय करू, असेही निवेदनात म्हटले आहे. 

जळगाव  : देशभरात सध्या "कोरोना'मुळे "लॉकडाउन' व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील सलून व्यवसाय बंद असून, आवश्‍यक अटींवर व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

नाभिक समाजातर्फे पदाधिकाऱ्यांनी सलून व्यावसायिकांची परिस्थिती प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "कोरोना' संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने "लॉकडाउन' केले असून, त्यामुळे सलून दुकाने 22 मार्चपासून पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा व्यावसायिकांपुढे ठाकला आहे. 95 टक्के सलून भाड्याच्या दुकानात आहेत. दुकानभाडेही आता कसे द्यावे, अशा विवंचनेत व्यावसायिक आहेत. त्यामुळे समाजाला कायद्याच्या बंधनात राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत प्रशासन घालून देत असलेल्या नियमांच्या चौकटीत राहून आम्ही व्यवसाय करू, असेही निवेदनात म्हटले आहे. 

निवेदन देतेवेळी शासनाच्या लॉकडाउन'मधील "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बंटी नेरपगारे यांच्या नेतृत्वाखाली नाभिक समाज विकास मंडळाचे जगदीश वाघ, पिंप्राळा परिसर नाभिक सेनेचे अशोक महाले, भिकन बोरसे, नाभिक समाज शहर संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख अरुण श्रीखंडे उपस्थित होते. दरम्यान, फैजपूरच्या प्रांताधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यावेळी यावल तालुक्‍यातील नाभिक समाजाचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर श्रीखंडे, समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, एकनाथ वसाने, किशोर वसाने, वहीद सलमानी, अविनाश शिवरामे उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Allow the salon business barbar society