Loksabha 2019 : भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘राष्ट्रवादी’ला ‘अच्‍छे`दिन’! 

Loksabha 2019 : भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘राष्ट्रवादी’ला ‘अच्‍छे`दिन’! 

यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या सुरवातीला केंद्रस्‍थानी असलेल्या अमळनेर तालुक्‍यातील आमदार स्‍मिता वाघ व जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची नावे उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र, राजकीय घडामोडीनंतर दोन्‍ही नावे मागे पडली आहेत. दोन्‍ही नेत्‍यांचे कार्यकर्ते नाराज झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनधरणीनंतर अनिल पाटील प्रचारात सक्रिय झाले आहेत. मात्र, स्‍मिता वाघ यांचे कार्यकर्ते प्रचाराबाबत आजही संभ्रमात आहेत. त्‍यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात सद्यःस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अच्‍छे दिन’ आले आहेत. ही अनुकूल परिस्‍थिती टिकून ठेवण्याचे आव्‍हान गुलाबराव देवकर यांच्‍यासमोर आहे; तर आमदार उन्‍मेष पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना ‘चेकमेट’ करण्यासाठी भाजपला उमेदवार देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर चाळीसगावचे आमदार उन्‍मेष पाटील यांना उमेदवारी दिल्‍यानंतर चित्र स्‍पष्ट झाले आहे. नाराज झालेल्या उमेदवार आमदार स्‍मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ तसेच वाघ दाम्पत्याचे स्‍थानिक भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे आवाहनही उन्‍मेष पाटील यांच्‍यासमोर उभे ठाकले आहे. त्‍यामुळेच गेल्‍या दोन- तीन दिवसांपासून मतदारसंघात भाजपचा प्रचार थंडावला आहे; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. 

जातीय समीकरणांचा आधार 
विधानसभेच्या अमळनेर मतदारसंघात दोन लाख ८९ हजार ५७० मतदार आहेत. या मतदारसंघात मराठा पाटील समाजाचे प्राबल्‍य आहे. मात्र, दोन्‍ही उमेदवार मराठा असल्‍याने इतर समाजांची मते निर्णायक ठरणार आहेत. यात माळी, तेली, राजपूत, गुर्जर, मुस्लिम, बौद्ध यांसह इतर समाजांच्या मतांचाही प्रभाव या निवडणुकीत दिसणार आहे. 

अनिल पाटलांची विधानसभेची रंगीत तालीम 
सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल भाईदास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्‍यानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली. नाराज झालेले अनिल पाटील यांची विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्‍यासमवेत भेट घडवून आणली. त्‍यावेळी अनिल पाटील यांनी संपूर्ण ताकदीनिशी आम्‍ही राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी उभे राहणार असल्‍याची ग्वाही दिली होती. त्‍या पार्श्वभूमीवर तालुक्‍यात त्‍यांनी गुलाबराव देवकर यांच्‍या प्रचाराला सुरवातही केली आहे. हा प्रचार जणूकाही विधानसभेची रंगीत तालीम असल्‍याने मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी अनिल पाटील व जिल्हा बँकेच्‍या संचालिका तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील प्रयत्‍न करीत आहेत. विशेष म्‍हणजे काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून प्रचाराला सुरवात केली आहे. यात काँग्रेसच्‍या प्रदेश सरचिटणीस ॲड. ललिता पाटील, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांचा समावेश आहे. 

भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात 
आमदार स्‍मिता वाघ यांची उमेदवारी पक्षाने रद्द केल्‍याने कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. श्रीमती वाघ यांनी यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, ऐनवेळी उमेदवारी रद्द करून उन्‍मेष पाटील यांना ती दिल्‍याने नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत स्‍थानिक भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दुसरीकडे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा भाजपचा दुसरा गट मात्र प्रचारात सक्रिय झाला आहे. गेल्‍यावेळी भाजपचे ए. टी. पाटील यांना ५७ हजारांचे मताधिक्‍य मिळवून दिले होते. हे मताधिक्‍य टिकून ठेवण्याचे आवाहन उन्‍मेष पाटील यांच्‍यासमोर आहे. त्‍यातच उन्‍मेष पाटील यांची सासरवाडी अमळनेर तालुक्‍यातील दहिवद येथील असल्‍याने त्‍याचा फायदाही त्‍यांना मिळणार असल्‍याचे बोलले जात आहे. तसेच आमदार शिरीष चौधरी यांनी उन्‍मेष पाटील यांच्‍यासाठी उमेदवारी अर्ज न भरता पाठिंबा दिला आहे. अपक्ष निवडून आलेले आमदार चौधरी हे भाजपचे ‘कमळ’ फुलविण्यासाठी पुढे येतील काय, असाही सूर सुज्ञ नागरिकांमधून व्‍यक्‍त होत आहे. 

लोकसभा २०१४ ची मते 
ए. टी. पाटील (भाजप) ः..................९४ हजार ६०० 
डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)..............३७ हजार ७०६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com