जळगावातील"अमृत'चे काम वेळेपूर्वीच 

राहुल रनाळकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव ः केंद्र सरकारच्या सहकार्याने शहरात सुरु असलेल्या अमृत योजनेची "डेडलाईन' नोव्हेंबर 2019 पर्यंतची आहे. तथापि, हे काम पाच महिने आधीच म्हणजेच मे 2019 पर्यंत पूर्ण करु, असा विश्‍वास जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

जळगाव ः केंद्र सरकारच्या सहकार्याने शहरात सुरु असलेल्या अमृत योजनेची "डेडलाईन' नोव्हेंबर 2019 पर्यंतची आहे. तथापि, हे काम पाच महिने आधीच म्हणजेच मे 2019 पर्यंत पूर्ण करु, असा विश्‍वास जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

अमृत योजनेचे काम जैन समूहाच्या माध्यमातून सध्या शहरात सुरु असून आत्तापर्यंत 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर या योजनेसाठीच्या 7 पैकी 5 पाण्याच्या टाक्‍यांचे महत्त्वाकांक्षी काम देखील सुरु झाल्याचे यावेळी जैन यांनी स्पष्ट केले. 
जैन पुढे म्हणाले, की अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सद्यस्थितीत शहरात वेगात सुरु आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात "वॉटर मीटर'चा समावेश होणे गरजेचे आहे. पण यासोबतच भुयारी गटारींचेही काम सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. हे काम मिळावे, म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. "आपले शहर' म्हणूनच या कामात आम्हाला रस आहे. भुयारी गटारी, पिण्याच्या पाण्याबाबत कर्नाटकने लक्षणीय प्रगती केली आहे. कर्नाटकातील चार शहरात तर आम्हीच काम केले आहे. प्रशासकीय यंत्रणा तेथे तत्परतेने काम करते, पण इथे मात्र लवकर हालचाली होत नाहीत. कर्नाटकात राखलेला दर्जा येथेही राखू आणि त्यातून जळगाव शहराचा पाणी आणि सांडपाण्याचा प्रश्‍न मिटेल, हीच आमची हे काम करताना भूमिका आहे. बहुमताने महापालिकेत सत्ता मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाचेच राज्य आणि केंद्रातही सरकार आहे. त्यामुळे उत्तम दर्जाच्या भुयारी गटारींच्या कामाकडे त्यांनी अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे. 

टेंडर प्रक्रियेचे स्वागत 
भुयारी गटारींच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली, ही स्वागतार्ह बाब आहे. पण त्यासाठी पुन्हा किमान तीन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. हे काम आम्हाला मिळायला हवे, असे अजिबात नाही. फक्त शहरातील रस्ते पुन्हा-पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये, हे पाहायला हवे. आमचे म्हणाल, तर अनेक टेंडर भरण्याची पूर्ण क्षमता असूनही आम्ही हातातील कामे पूर्ण करण्यासाठी मोठमोठे टेंडर सोडून दिले आहेत. जळगावचे काम कोणालाही द्या. फक्त ते वेळेत, दर्जेदार पद्धतीने पूर्ण करुन लोकांना दिलासा द्या, एवढेच आमचे म्हणणे असल्याचे अशोक जैन म्हणाले. 

रस्त्यांची कामे सुरु होणे शक्‍य 
अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम आणि भुयारी गटारींचे काम ज्या-ज्या भागात होत जाईल, तेथील रस्ते बनविण्याचे काम हाती घेता येणे शक्‍य आहे. दोन्ही कामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे करावीत, असे अजिबात नाही. त्यामुळे आता महापालिकेतील नव्या सत्ताधाऱ्यांना झटपट कामे दाखवायची असतील, तर रस्त्यांची कामेही एका बाजूला सुरु करावी लागतील, त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल. 

Web Title: marathi news jalgaon amrut yojna