सात दिवसांत कामाला गती द्या, अन्यथा कारवाई..! 

सात दिवसांत कामाला गती द्या, अन्यथा कारवाई..! 

जळगाव : गेल्या वर्षभरापासून शहरात "अमृत' योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून, कामात गती नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाकडून परवानग्या व अन्य तांत्रिक बाबींमुळे कामास विलंब होत असल्याचा दावा मक्तेदाराने केल्यानंतर आता महापालिकेनेही "जैन इरिगेशन' या एजन्सीला सात दिवसांत काम सुधारा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला आहे. 
जळगाव शहरात महत्प्रयासाने "अमृत' योजना मंजूर झाली. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीची तरतूद होऊन पाणीपुरवठा योजनेचे काम मक्तेदार जैन इरिगेशनला देण्यात आले आहे. 

वर्षभरापासून रखडले काम 
दीड वर्षापूर्वीच त्यासंबंधी कार्यादेश देऊन येत्या नोव्हेंबर 2019 पर्यंत जलवाहिन्या व पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करायचे होते. मात्र, वर्षभरापासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी शहरातील काही प्रमुख मार्गांसह वस्त्यांमधील जवळपास सर्वच रस्ते खोदण्यात आले असून, ऐन पावसाळ्यात त्यावर चिखल साचून नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. लहान-मोठे अपघात दररोज घडत असून मक्तेदार व "मनपा' प्रशासनाबद्दल जनमानसात तीव्र भावना आहेत. 

तांत्रिक बाबींमुळे विलंब 
दरम्यान, या कामास काही तांत्रिक बाबी व मनपा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या रखडल्याने विलंब होत असल्याचा खुलासा "जैन इरिगेशन'तर्फे गेल्याच आठवड्यात करण्यात आला. यापूर्वीही महापालिकेने मक्तेदाराला पत्र पाठविले होते. यावर "जैन इरिगेशन'ने "मनपा'ला खुलासा देत महापालिकेवर चुकीचे आक्षेप घेतले होते. या खुलाशावर महापालिका प्रशासनातर्फे शहर अभियंता सुनील भोळे यांनी मक्तेदार "जैन इरिगेशन'ला पाठविलेल्या पत्रात मक्तेदार कंपनीस सात दिवसांत कामाच्या गतीमध्ये सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. या पत्रांच्या प्रती महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, "मजिप्रा' यांनाही दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com