धक्कादायक... "मनपा'त अनधिकृत बांधकामांचे रेकॉर्डच नाही 

धक्कादायक... "मनपा'त अनधिकृत बांधकामांचे रेकॉर्डच नाही 

जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 
शहरात बांधकाम करण्यासाठी नगररचना विभागाच्या अंतर्गत मंजुरी दिली जाते. शहरातील बांधकाम अनधिकृत असेल तर नगररचना त्याबाबतचा अहवाल तयार करून तो बांधकाम विभागाकडे देते, त्यानंतर अतिक्रमण विभागातर्फे बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात येते. महापालिकेतर्फे शहरात गेल्या काही वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी नगररचना विभागाने बांधकाम विभागाकडे 84 इमारतींचे बांधकाम अधिकृत असल्याबाबत अहवाल देऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 
 
"त्या' बांधकामांवर कारवाई नाही 
बांधकाम विभागाकडे अधिकृत नोंदी असलेल्या 84 अनधिकृत इमारतींवर "हातोडा' मारण्याचा आदेश होता. मात्र प्रथम आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर द. प. मेतके यांनी याच इमारतीवर कारवाईचा बडगा उगारला होता. तत्कालीन उपायुक्त इतबार तडवी यांना त्याबाबत अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी धडाकाच लावला होता. मात्र त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनीच राज्याच्या नगरविकास विभागाकडे धाव घेऊन यावर "स्टे' आणला होता. त्यावेळी ही कारवाई बंद करण्यात आली होती. 

..त्यानंतर कारवाईच नाही 
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास शासनाचा "स्टे' असल्यामुळे पुढे कारवाईच झाली नाही. त्यानंतर शहरात अनेक अनधिकृत कामे उभी राहिली. महापालिकेनेही अद्याप या इमारतीच्या बांधकामाचे सर्व्हेक्षण केलेच नाही. त्यामुळे नवीन अनधिकृत कामाची माहिती पुढे आलीच नाही. तर नगररचना विभागाने अनधिकृत ठरविलेल्या व नगरविकास विभागाने "स्टे' दिलेल्या त्या 84 अनधिकृत बांधकामांवर आजपर्यंत कारवाई झालेलीच नाही. 

आता तर महापालिकेत नोंदीच नाहीत 
गेल्या वीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. आजच्या स्थितीत महापालिकेच्या नगररचना विभागात कोणत्याही अनधिकृत बांधकामाची नोंदच आढळत नाही, त्यामुळे बांधकाम विभागाकडे अधिकृत बांधकामाची माहिती नाही. यामुळे भोगवटा प्रमाणपत्र न घेण्याऱ्या इमारतीवर कर आकारणीच केली जात नाही. त्यामुळे ते या इमारतीचे मालक घरपट्टीच भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे; परंतु महापालिकेचा ढिसाळ कारभारच याला जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. 

गणपतीनगरातील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात 
महापालिकेकडे जर अनधिकृत बांधकामाची नोंदीच नाहीत तर मग गणपतीनगरातील या इमारतीचीच नोंद महापालिकेत कशी झाली. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच भागात केवळ एकाच इमारत अनधिकृत कशी ठरविली? हा सर्वच प्रकार संशयास्पद असून महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही याबाबतीत आता चौकशी होण्याची गरज आहे. 
 
250 अनधिकृत तळघरांचे काय? 
तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे असताना त्यांनी शहरातील बेसमेंट (तळघर), बांधकामांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी देखील शहरातील 250 पेक्षा अधिक अनधिकृत इमारतींचे अनधिृक तळघरांना नोटीस देऊन नगररचना विभागामार्फत सुनावणी घेऊन देखील अनेक अनधिकृत तळघरांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय शहरातील 250 रुग्णालयांच्या तळघराचे कामही अनधिकृत असल्याचा नगररचना विभागाने बांधकाम विभागाकडे अहवाल दिलेला आहे. मात्र त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही. 

35 रुग्णालयांचे अनधिकृत तळघर 
शहरातील सुमारे 250 डॉक्‍टर्ससह प्रमुख रस्त्याजवळील कॉम्प्लेक्‍सच्या बेसमेंटमध्ये असलेले अतिक्रमण महापालिकेकडून काढण्याची कारवाई गेल्या चार ते पाच महिन्यांपासून महापालिकेकडून होणार होती. यात 35 डॉक्‍टर्सना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. आयुक्तांनी नगररचना विभागाला आदेश देऊनही नगररचना तसेच अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई झालेली नाही. मग अचानकपणे एकाच इमारतीवर कारवाई करण्याची गौडबंगाल काय, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. 

विनापरवानगी बांधकामांच्या सर्वेक्षणाची गरज 
महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच बिकट, त्यात शहरातील सुमारे 400 बांधकामे विनापरवानगी असल्याचा अंदाज आहे. अशा मालमत्तांचा शोध नगररचना विभागाने घेतल्यास अनधिकृत मालमत्तांकडून दंडात्मक वसुली केल्यास महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. अशा मालमत्तांचा शोध घेण्याची मोहीम तत्कालीन नगररचनाकार सी. आर. निकम यांनी हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सन 2013, 2012, 2011 अशा उलट्या क्रमाने तपासणी करणार होते. त्या वर्षात किती बांधकामांना परवानगी दिली? किती जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले? याची तपासणी करून त्या तफावतीच्या साहाय्याने या बांधकामांचा शोध ते घेणार होते, परंतु प्रत्यक्षात हे सर्वेक्षण झालेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com