अंगणवाडीत बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव ः अंगणवाडीमधील बालकांना पौष्टिक आहार म्हणून पुरवठा करण्यात आलेल्या शेवया बुरशीयुक्त असल्याचे अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील अंगणवाडीमध्ये उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे शेवयांच्या पाकिटाची मुदत संपण्यास अजून चार महिन्यांचा अवधी बाकी असताना अशा निकृष्ट दर्जाच्या बुरशीयुक्‍त शेवयांच्या पुरवठ्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली. 

जळगाव ः अंगणवाडीमधील बालकांना पौष्टिक आहार म्हणून पुरवठा करण्यात आलेल्या शेवया बुरशीयुक्त असल्याचे अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील अंगणवाडीमध्ये उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे शेवयांच्या पाकिटाची मुदत संपण्यास अजून चार महिन्यांचा अवधी बाकी असताना अशा निकृष्ट दर्जाच्या बुरशीयुक्‍त शेवयांच्या पुरवठ्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज (ता. 3) अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर पाटील, प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर आदी उपस्थित होते. 

अंगणवाडीच्या पोषण आहारातील शेवयांना बुरशी व दुर्गंधी येत असल्याची तक्रार जि. प. सदस्या रेखा राजपूत यांच्याकडे आली होती. त्यानुसार श्रीमती राजपूत, दिलीपसिंग राजपूत यांच्यासह पाचोरा सीडीपीओ यांनी अंबेवडगाव येथील अंगणवाडीत शेवयांची पाहणी केली. यात शेवयांना बुरशी लागल्याचे उघडकीस आल्याबाबतचा मुद्दा रावसाहेब पाटील यांनी आजच्या स्थायी सभेत उपस्थित केला. शेवयांचा पुरवठा धुळे येथील महाराष्ट्र महिला सहकारी गटाकडून झाला असून, हा ठेका रद्द करून पुरवठादार संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रावसाहेब पाटील यांनी केली. यावर उपाध्यक्ष महाजन यांनी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

बेंच टेंडरचा विषय गाजला 
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बेंच पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेली ई- टेंडर प्रक्रिया मॅनेज करण्याची तक्रार आली होती. तरीही नमुने मागवून टेंडर काढण्यात येत आहे. याबाबत नानाभाऊ महाजन यांनी सभेत प्रश्‍न उपस्थित केला. समाजकल्याण विभागाच्या भजनी मंडळ साहित्याच्या टेंडरप्रमाणे बेंच पुरवठ्याचे टेंडर काढण्यात आले. पण, भजनी मंडळाच्या टेंडरमधील त्रुटींवरून ते टेंडर रद्द करण्यात आले. त्यानुसार बेंच पुरवठ्याचे टेंडरही रद्द करण्याची मागणी महाजन यांनी केली. पण, यावर सभापती पोपट भोळे यांनी बेंचसाठीचा निधी मानव विकास मिशनचा असल्याने जिल्हा परिषदेला यावर अधिकार नसल्याचे उत्तर दिले. 

सरपंचाच्या पतीने काढली रक्‍कम 
ग्रामपंचायतींना 14 वित्त आयोगाचा निधी थेट मिळतो. परंतु, नगरदेवळा येथील ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीतून 1 लाख 30 हजार रुपये इतकी रक्‍कम सरपंचांच्या पतीने परस्पर काढून घेतल्याबाबतचा प्रकार रावसाहेब पाटील यांनी सभेपुढे मांडला. सदर प्रकाराबाबत चौकशी करून रक्‍कम काढून घेतल्याचे स्पष्ट झाल्यास सरपंचावर 139 नुसार अपात्रतेच्या कारवाई संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सीईओ दिवेकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon anganvadi poshan aahar