कुपोषण निर्मूलनासाठी स्थापणार जिल्ह्यात 468 ग्रामबालविकास केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

जळगाव ः कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे; यासाठी अंगणवाडी केंद्रस्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 893 अतितीव्र कमी वजनाच्या कुपोषित बालकांसाठी 468 केंद्र सुरू केली जाणार आहे. 

जळगाव ः कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे; यासाठी अंगणवाडी केंद्रस्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात 893 अतितीव्र कमी वजनाच्या कुपोषित बालकांसाठी 468 केंद्र सुरू केली जाणार आहे. 

कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत योजना राबविल्या जातात. कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार दिला जातो. यातील तीव्र कुपोषित गटातील बालकांना अंगणवाडीस्तरावर तीन महिने सतत उपचार मिळावे यासाठी ग्राम बालविकास केंद्राची सुविधा केली जाणार आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रातील बालकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाअंती अतितीव्र, तीव्र कुपोषित बालकांचे वर्गीकरण करून ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरात 893 अतितीव्र कुपोषित बालके असून यांच्यावर उपचार करण्यासाठी 468 केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

अंगणवाडी सेविकांना मानधन 
प्रत्येक गावात बालकांचे वजन, उंची, लांबी व दंडघेर घेऊन बालकांचे वर्गीकरण करण्यात येते. तीव्र कुपोषित आढळून आल्यास त्या बालकाला ग्राम बालविकास केंद्रात पोषक आहार व औषधी दिली जाणार आहे. येथे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका यांची नेमणूक असेल. यासाठी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना प्रति बालक पाच रुपयांप्रमाणे मानधनाची तरतूद आहे. कुपोषित बालकांना कोणत्या पोषणतत्वांचा अतिरिक्त डोस द्यायचा याचा एकंदरीत अंदाज येणार आहे. त्यानुसार अतितीव्र गटातील कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित करून 28 दिवस उपचार केले जाणार आहे. यानंतर देखील सुधारणा न झाल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार काही आठवडे वाढ करण्यात येईल. 

एका बालकामागे दिवसाला 90 रुपये खर्च 
बालविकास केंद्रांमध्ये एका दिवसासाठी प्रति बालक 75 रुपये खर्च असून अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना प्रतिबालक पाच रुपये मानधन याप्रमाणे एका बालकामागे दिवसाला 90 रुपये खर्च आहे. यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून 28 दिवसांसाठी 21 लाख 25 हजार 340 रुपये निधीचे वाटप करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news jalgaon anganwadi poshan