बहिष्कृत कुटुंब पुन्हा परतले समाजात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

जळगाव : चाळीसगाव येथील रहिवासी रमेश शिवाजी घुले यांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने त्यांना न्याय मिळवून देण्यात यश मिळाले. गवळी समाजाच्या महत्वाच्या सगर उत्सवामध्ये त्यांना पूजेचा मान समाजातर्फे मिळाला. तब्बल १३ वर्षे त्यांना गवळी समाजाने वाळीत टाकले होते. 

जळगाव : चाळीसगाव येथील रहिवासी रमेश शिवाजी घुले यांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने त्यांना न्याय मिळवून देण्यात यश मिळाले. गवळी समाजाच्या महत्वाच्या सगर उत्सवामध्ये त्यांना पूजेचा मान समाजातर्फे मिळाला. तब्बल १३ वर्षे त्यांना गवळी समाजाने वाळीत टाकले होते. 

रमेश घुले यांनी २००६ या वर्षी आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले. रमेश घुले यांच्या भावांनी समाजपंच मंडळींशी संगनमत करुन तडजोड केली. परंतु रमेश घुले यांना मात्र समाजातून बहिष्कृत केले. रमेश घुले यांना मारहाण झाली व गाव सोडण्यास भाग पाडले. त्यांनी पुणे जवळ शिक्रापूर येथे नव्याने आपला संसार मांडला. मोलमजुरी, नंतर चहाची टपरी टाकत संसार उभा केला. त्यांना मुलगा झाला त्यावेळी कुटुंबात व समाजात जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कुटुंबीयांना समाज पंचांकडून मारहाण झाली. त्यांनीं पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पण चाळीसगाव पोलिसांनी त्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले ते परत शिक्रापूर येथे गेले. २०१७ यावर्षी अंनिसच्या पाठपुराव्याने व मागणीने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाबाबत माहिती मिळताच रमेश घुले यांनी कायद्याचे समन्वयक अंनिसचे नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. रमेश घुले शिक्रापूर येथे असल्याने त्यांनी चांदगुडे यांचे मदतीने पुणे शाखेशी संपर्कात राहून त्यांची आपबिती कथन केली. हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांचेकडे सोपविण्यात आली. त्यानुसार दिगंबर कट्यारे यांनी चाळीसगाव स्थानिक शाखेचे कार्यकर्ते नीता सामंत यांच्याशी संपर्क करत चाळीसगाव पोलिसात तक्रार नोंदवली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे चाळिसगाव येथिल पोलिस अधिकारी यांनी हे प्रकरण समजून घेतले. त्यांनी गवळी समाजातील पंचांना बोलावून समज दिली. त्यांना सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा समजून देण्यात आला. पंचांनी रमेश घुले यांना समाजातून बहिष्कृत टाकण्याचा निर्णय मागे घेतला असे तोंडीं सांगितले. दिवाळीच्या निमित्ताने गवळी समाजाचा सगर उत्सव होतो. त्या उत्सवात एका रेड्याला सजवले जाते व त्याची पुजा होते. हि पुजा रमेश घुले यांनी केली. त्यांना कोणीही विरोध केला नाही. घुले परिवाराला १३ वर्षाचा संघर्ष आठवून अश्रू अनावर झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anis bahishkrut family