अंजाळे, पिळोदा पुलाचे काम मार्गी 

अंजाळे, पिळोदा पुलाचे काम मार्गी 

जळगाव : शेळगाव बॅरेजमध्ये पाणी अडविल्यानंतर बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या मोर नदीवरील अंजाळे, पिळोदा पुलाच्या कामास आता चालना मिळाली आहे. या दोन्ही पुलांचे काम हाती घेण्यात आले असून ते वर्षभरात पूर्ण होईल, असा अंदाज आहे. सोबतच अंजाळे घाट तोडून त्याठिकाणी विस्तीर्ण रस्त्याचे कामही मार्गी लागले आहे. 

तत्कालीन युती शासनाच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना एकनाथराव खडसेंनी तापीवर विविध बॅरेजला मंजुरी दिली, त्यातून शेळगाव बॅरेजही मंजूर झाले. त्याचे काम सुरू झाले. मात्र, वीस वर्षांनंतरही ते काम पूर्ण झालेले नाही. गेल्या सरकारच्या टर्ममध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी हे बॅरेज केंद्र सरकारच्या बळिराजा संजीवन योजनेत घेण्यात आले. त्याला 699 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. त्यातून हे काम मार्गी लागत असून, वर्षभरात त्यात पाणी अडविले जाईल, असे सांगितले जात आहे. 

पूल ठरत होता अडथळा 
शेळगाव बॅरेजमध्ये पाणी अडल्यास त्याच्या बुडीत क्षेत्रात (बॅकवॉटर) भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदीवरील जुना पूल जातो. बॅरेजमध्ये पाणी अडविल्यास हा पूल पाण्याखाली जाऊन संपर्क तुटेल, अशी स्थिती आहे. दहा वर्षांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल करण्यासंबंधी पाटबंधारे विभागास प्रस्ताव दिला होता. बुडीत क्षेत्रातील पुलाच्या बांधकामाचा खर्च पाटबंधारे विभागाला करावा लागतो. असे असताना पाटबंधारे विभागाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आठ- दहा वर्षे हे काम रखडले होते. 

बॅरेजच्या कामापाठोपाठ पूल 
दरम्यानच्या काळात शेळगाव बॅरेजच्या कामास गती मिळाली. आता बॅरेजमध्ये गेट टाकण्याचे काम सुरू होऊन यावर्षी पावसाळ्यात पाणी अडविण्याचे नियोजन आहे. तसे झाले आणि अंजाळे, पिळोदा पूल तयार नसले, तर ते पूल पाण्याखाली जातील. म्हणून हे पूल करणे गरजेचे होते. त्यानुसार हरिभाऊ जावळेंनी पाठपुरावा करत या पुलासह अंजाळे घाटरस्त्यालाही मंजुरी घेतली असून, ही कामे मार्गी लागली आहेत. 

70 कोटींचे दोन पूल 
अंजाळे व पिळोदा या दोन्ही पुलांचे काम सुमारे 70 कोटींचे असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अग्रवाल कन्स्ट्रक्‍शनला ते काम देण्यात आले आहे. कामाला चालनाही मिळाली असून, वर्षभरात ते काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सोबतच अडचणीचा व अपघातांना कारणीभूत ठरणारा अंजाळे घाट तोडून त्याठिकाणी सरळ रस्ता करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com