बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर रस्त्याचे काम मार्गी : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. 

जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. 

बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याच्या कामासह अन्य कामांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता विनय देशपांडे, जळगाव विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनावणे, कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते. 

मार्चपर्यंत काम पूर्ण करा 
बैठकीत बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाची दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यावर मंत्री पाटील यांनी या रस्त्याच्या जळगाव जिल्ह्यातील 45 किलोमीटर टप्प्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून ते मार्चपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश दिले. 

यावल तालुक्‍यातील बऱ्याच दिवसांपासून चोपडा-जळगाव तालुक्‍याला जोडणारा शिरागड-कोळन्हावी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी रक्षा खडसे यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि खडसेंनी शहादा ते शिरपूर (धुळे जिल्हा हद्द) या 19 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंजूर असून ते लवकर सुरू करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार या कामांच्या निविदा काढण्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले. 
 
"हायब्रीड ऍन्युइटी'नुसार काम 
बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर हा महामार्ग घोषित करण्यात आला होता, मात्र त्याच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे हा मार्ग चौपदरी होऊ शकत नसून तो आता तीन पदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर त्याचा दोनशे ते तीनशे कोटी रुपये खर्चाचा "डीपीआर' लवकर तयार करून त्यास मंजुरी घ्यावी, अशा सूचनाही चंद्रकांत पाटलांनी केल्या. 
 
अन्य रस्त्यांचाही आढावा 
जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या अन्य रस्तेकामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने जळगाव-पाचोरा- भडगाव- चांदवड, औरंगाबाद- जळगाव, पहूर- जामनेर- बोदवड- बऱ्हाणपूर या रस्त्यांची कामे किती झालीत, त्याची गती यासंदर्भात मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचनाही दिल्या. 

Web Title: marathi news jalgaon ankleshwar road work