"अर्थमुव्हर्स' योजनेंतर्गत एकालाच मिळाला लाभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

जळगाव ः सुशिक्षित बेरोजगारांसाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जेसीबी यंत्र जिल्ह्यातील 49 लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्याला मिळाले आहे. इतर लाभार्थ्यांना बॅंका कर्ज देण्यास पुढे येत नसल्याने युवकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. 

जळगाव ः सुशिक्षित बेरोजगारांसाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जेसीबी यंत्र जिल्ह्यातील 49 लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्याला मिळाले आहे. इतर लाभार्थ्यांना बॅंका कर्ज देण्यास पुढे येत नसल्याने युवकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. 
सहकार विभागाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत जेसीबी यंत्र घेण्यासाठी बेरोजगारांकडून अर्ज मागविले होते. त्या अंतर्गत जिल्ह्यात आपले सरकार पोर्टलवर दोन हजार सुशिक्षित बेरोजगारांनी जेसीसी यंत्रासाठी अर्ज केले. त्यापैकी 171 अर्जाची निवड झाली. त्यात 49 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना वीस लाखांचे अर्थसाहाय्य देण्याबाबत पत्र देण्यात आले. जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित उमेदवारांना या योजनेंतर्गत कर्ज देण्याबाबत पत्र दिले. ते पत्र बेरोजगारांनी बॅंकांना दिले. मात्र बॅंकांनी तारणाशिवाय कर्ज मिळणार नाही, तारण ठेवा तरच कर्ज मिळेल, असे सांगितल्याने बेरोजगारांच्या पदरी निराशाच आली आहे. 
सूरज विजय नारखेडे (रा. जुने जळगाव) यांनी मात्र इंडियन बॅंकेकडून कर्जसहाय्य मिळविण्यात यश मिळविले आहे. नारखेडे यांनी जिल्हा उपनिबंधकांनी दिलेले पत्र इंडियन बॅंकेच्या व्यवस्थापकास दाखविले. त्यावर त्यांनी योजनेच्या अटी शर्ती वाचल्या. नारखेडे यांना विना अट, विना तारण वीस लाखांचे कर्ज देऊ, असे पत्र दिले. नंतर ते पत्र जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले. लाभार्थी, बॅंक, जिल्हा उपनिबंधक यांनी त्रिपक्षीय करार झाला. त्यानंतर बॅंकेने विनाव्याज, विना अट कर्ज दिले. नारखेडे यांनी त्याद्वारे जेसीबी यंत्र घेऊन कामेही सुरू केली आहेत. नवीन जेसीबीची किंमत 27 लाख 75 हजार आहे. योजनेंतर्गत 20 लाखांचे अर्थसाहाय्य मिळाले. वरील 7 लाख 75 हजार नारखेडे यांनी अदा केले. योजनेंतर्गत 5 लाख 80 हजार त्यांना माफ होतील. उर्वरित निव्वळ रक्‍कम नारखेडे यांना हप्त्याने भरावी लागणार आहे. 

 
अर्थमुव्हर्स योजनेंतर्गत मिळालेल्या जेसीबीद्वारे मी खासगी कामे सुरू केली आहेत. इंडियन बॅंकेकडून मला सहकार्य मिळाले. जलसंधारण, जलयुक्त योजनेंतर्गत कामे मिळतील. त्याद्वारे उर्वरित कर्ज फेडेन. 
सूरज नारखेडे, लाभार्थी

Web Title: marathi news jalgaon arthmuvhars yojna