मदतीच्या बहाण्याने "एटीएम' बदलवून गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जळगाव : "एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी दुसऱ्याची मदत घेत असाल, तर सावधान! शहरात मदतीच्या बहाण्याने गंडविल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना स्वातंत्र्य चौकातील स्टेटबॅंकेच्या "एटीएम'मध्ये घडली. पैसे काढण्यासाठी आलेल्या बांधकाम मिस्तरीचे एटीएम कार्ड हातोहात बदलून भामट्याने तीस हजारांचा गंडा घातला. एटीएम कार्ड स्वॅप केल्यावर पैसे निघत नसल्याने रांगेत उभ्या एकाने मदतीचा बहाणा करून त्याच्याजवळील जुने "एटीएम' हातात देत चालू खात्याचे कार्ड घेऊन पोबारा केला.

जळगाव : "एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी दुसऱ्याची मदत घेत असाल, तर सावधान! शहरात मदतीच्या बहाण्याने गंडविल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना स्वातंत्र्य चौकातील स्टेटबॅंकेच्या "एटीएम'मध्ये घडली. पैसे काढण्यासाठी आलेल्या बांधकाम मिस्तरीचे एटीएम कार्ड हातोहात बदलून भामट्याने तीस हजारांचा गंडा घातला. एटीएम कार्ड स्वॅप केल्यावर पैसे निघत नसल्याने रांगेत उभ्या एकाने मदतीचा बहाणा करून त्याच्याजवळील जुने "एटीएम' हातात देत चालू खात्याचे कार्ड घेऊन पोबारा केला. नंतर त्यातून टप्प्याटप्प्याने तीन वेळा असे एकूण तीस हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी मोतीलाल भागवत सपकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

रामानंदनगर येथील रहिवासी मोतीलाल भागवत सपकाळे (वय 32) बांधकाम मिस्तरी आहेत. गेल्या महिन्यात 12 ऑगस्टला ते स्वातंत्र्य चौकातील स्टेट बॅंकेत पैसे काढण्यासाठी आले होते. एटीएममध्ये कार्ड स्वॅप केल्यावर पैसे निघत नसल्याने त्यांच्या मागे रांगेत असलेल्यांपैकी एकाने मी आधी काढून घेतो, असे सांगत त्यांच्याजवळील एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा केला. नंतर मोतीलाल यांना मदत म्हणून त्यांचे कार्ड घेत स्वॅप केले आणि एटीएम "आउट ऑफ ऑर्डर' असल्याचे सांगत त्यांच्या हातात स्वत:जवळील जुने एटीएम हातात टेकवून पोबारा केला. दोन- तीन दिवसानंतर मोतीलाल सपकाळे यांच्या मोबाईलवर 10 हजार रुपये एटीएमद्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला, लगेच दुसऱ्या दिवशी परत दोन वेळा 10 हजार असे एकूण 30 हजार रुपये विड्रॉल करण्यात आल्याचे मेसेज आले म्हणून त्यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केल्यावर त्यांच्याजवळील एटीएम त्यांच्या नावाचेच नसल्याचे उघडकीस आले. एटीएमवर पैसे काढण्यासाठी त्या दिवशी आले असताना त्यांच्या हातात भामट्याने दिलेले एटीएम "राही विलास भिडे' यांचे नावाचे आणि स्टेट बॅंकेचेचे असून, जुने एटीएम असल्याचे समोर आले आहे. मोतीलाल सपकाळे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, भामट्याचा शोध सुरू आहे. 

एटीएम कोणालाही देऊ नका! 
आपले एटीएम कार्ड शक्‍यतो स्वत:च वापरा, तुमच्या खात्यातील देवाण-घेवाण करण्यासाठी कार्ड फक्त तुम्हाला दिले असून.. कुटुंबातील सदस्यांनाही ते देणे योग्य नसल्याचे बॅंकेचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे, कोणाचाही फोन आला आणि बॅंकेतून बोलतोय, अशा भुलथापा देत कार्डवरील क्रमांकाची विचारणा केली किंवा मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला तर मुळीच देऊ नये, असे वारंवार सायबर पोलिसांकडून सांगण्यात येते. 

अशी होते फसवणूक 
कमी गर्दी असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एटीएमवर बऱ्यापैकी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते, तसेच सर्वसामान्य खातेदारही स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक, पंजाब नॅशनल, बडोदा बॅंक अशा राष्ट्रीयीकृत बॅंकेतच व्यवहार करणे पसंत करतात म्हणून भामटे येथेच सापळा लावून असतात. बहुतांश एटीएमवर बॅंकांनी सुरक्षारक्षक ठेवणे बंद केले आहे. परिणामी, अशा एटीएम यंत्राच्या स्टल-की पॅडवर एक-दोन थेंब "फेविक्विक' सोडले जाते..अजाणतेपणी कोणीही विड्रॉलसाठी शिरताच मागावर असलेले भामटे मदतीचा आव आणतात. "फेविक्विक'मुळे बटन दाबले जात नाही..परिणामी, पैसे निघत नसल्याने मागची व्यक्ती मदतीचा आव आणते..कार्डस्वॅप केल्यावर पिनकोडही आपण सांगून टाकतो, नंतर तो भामटा त्याच्याजवळचे कार्ड तुमच्या हातात टेकवून तुमचे कार्ड घेऊन पोबारा करतो..नंतर दुसऱ्याच "एटीएम'मधून पैसे काढून गंडवतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon atm machine froad