औरंगाबाद मार्गाचे काम आता "सबकॉन्ट्रॅक्‍टर' करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

जळगाव : वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाल्याने औरंगाबाद- जळगाव रस्ता नावालाच उरला असून अर्धवट काम सोडून फरार झालेल्या मूळ मक्तेदाराची सर्व यंत्रणा "सील' करण्यात आली आहे. आता हे काम "सब कॉन्ट्रॅक्‍टर'कडून करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यादृष्टीने संबंधित मक्तेदारास सूचनाही देण्यात आल्या आहेत. या महिन्यातच कामाला नव्याने सुरवात होईल, असे सांगितले जात आहे. 

जळगाव : वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाल्याने औरंगाबाद- जळगाव रस्ता नावालाच उरला असून अर्धवट काम सोडून फरार झालेल्या मूळ मक्तेदाराची सर्व यंत्रणा "सील' करण्यात आली आहे. आता हे काम "सब कॉन्ट्रॅक्‍टर'कडून करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यादृष्टीने संबंधित मक्तेदारास सूचनाही देण्यात आल्या आहेत. या महिन्यातच कामाला नव्याने सुरवात होईल, असे सांगितले जात आहे. 

औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या वर्ष, दीड वर्षापासून लागलेले ग्रहण अद्याप सुटायला तयार नाही. औरंगाबादकडून सुरू झालेल्या या कामात मूळ हैदराबादच्या मक्तेदाराने पहूरपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूचा भाग खोदून काढत त्यावर माती-मुरूम टाकला. परंतु, निधीअभावी वर्षभरापासून हे काम ठप्प आहे. काही ठिकाणी संथगतीने काम सुरू असल्याचे या काळात दिसून आले. 

वाहनधारकांचे हाल 
ठप्प झालेल्या कामामुळे अस्तित्वात असलेल्या रस्त्याचीही वाट लागली. एकतर मूळ रस्ता अरुंद झाला, शिवाय माती- मुरूम या रस्त्यावरही पसरत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली. कोणतेही वाहन रस्त्यावरून जाऊ शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली असून ती बदलायला तयार नाही. 

ट्रॅव्हल्सचालकांचा बंद 
याच मार्गावरून पुण्याकडे दररोज साठ- सत्तर खासगी बस जातात. या ट्रॅव्हल्सचालकांनी काल-परवा तीन दिवस बंद पाळला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. त्याची दखल अद्याप प्रशासनाने घेतलेली नाही. 

"सब कॉन्ट्रॅक्‍टर' करणार काम 
दुसरीकडे हे काम आता सब कॉन्ट्रॅक्‍टरकडून करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबादच्या महामार्ग सर्कलचे अधिकारी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. चौपदरीकरणाचे काम करणारा मूळ मक्तेदार काम अर्धवट सोडून गेला असून हे काम अन्य मक्तेदारास सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

यंत्रणा केली "सील' 
मूळ मक्तेदाराने काम अर्धवट सोडले असून काही कामगार व एजन्सीचे पेमेंट थकविले आहे. ते पेमेंट देण्यासाठी मूळ मक्तेदाराची यंत्रणा "सील' करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्याने काम घेणाऱ्या एजन्सीकडे ही यंत्रणा सुपूर्द करून काम करून घेतले जाणार आहे. यासंदर्भात महामार्ग विकास प्राधिकरणाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाल्याचे सांगण्यात आले. 

मूळ मक्तेदाराकडील काम सबकॉन्ट्रॅक्‍टरला देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता व अन्य प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या महिनाभरात पुन्हा हे काम नव्याने सुरू होईल. 
- पी. एस. औटी (अतिरिक्त पदभार) कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महामार्ग सर्कल (औरंगाबाद) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aurngabad highway work subcontractor