esakal | बॅडमिंटनचा "तो' चेंडू ठरला बंगल्यासाठी "बॅड' 
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटनचा "तो' चेंडू ठरला बंगल्यासाठी "बॅड' 

बॅडमिंटनचा "तो' चेंडू ठरला बंगल्यासाठी "बॅड' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे बंधू रमेश जैन बॅडमिंटन प्लेअर आहेत. तत्कालीन महापालिकेत आयुक्त पदावर मिसरुड फुटलेलं कोवळं पोरगं म्हणवून हिणवले गेलेले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम कार्यरत होते. रमेशदादा आणि डॉ. गेडाम दोघांची ओळखी जरी महापालिकेत झालेली असली, तरी मैत्री मात्र बॅडमिंटन कोर्टवर फुलली. सकाळचा चहा दोघेही सोबत घेऊन खेळाने दिनचर्येला सुरवात करीत होते. घरकुल रिन्युवेशनचा विषय ऐरणीवर असताना गेडामांनी सुरेशदादा, राजा मयूर, नाना वाणी यांना दिलेल्या प्रस्तावावरून खटके उडत असतानाच एकदा बॅडमिंटन कोर्टवर रमेशदादांचा संताप उफाळला. "आमचं ऐकत नाही', अशा इगो आणि संतापात रमेशदादांनी फटकारलेला बॅडमिंटनचा "तो' चेंडू सात-शिवाजीनगर साठी "बॅड' ठरला. नंतर महासभेत वाद होऊन रमेशदादांनी गेडामांना "माकड' संबोधले, तर त्यावर गेडामांनी "होय... आहेच माकड. आता रावणाची लंका हा माकड कशी पेटवून देतो तेच दाखवतो', असे म्हणत काढता पाय घेतला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2006 शहर पोलिस ठाण्यात डॉ. गेडाम यांनी घरकुल विषयी फिर्याद दिली. 

ऐतिहासिक अटक मोर्चा 
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या विरुद्ध मोर्चे निघाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी गेडामांना चोवीस तास बंदूकधारी सुरक्षारक्षक पुरवला. गुन्ह्याच्या तपासाला सुरवात होत नाही, तोवर तत्कालीन मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनात भव्य अटक मोर्चा काढून सध्या विविध पक्षाचे पदाधिकारी असलेले, नगरसेवकांसह सामान्य नागरिक सहभागी झालेल्या या मोर्चाद्वारे पोलिस दलाने आम्हाला सर्वांनाच अटक करून घ्यावी, अशी भूमिका जैन गटाने घेतली होती. तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी मोर्चेकऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांची सुरेशदादांशी थेट बाचाबाची झाली. "बघतोस काय मोठाले डोळे करून, खाऊन घेशील का? शासनाचा नोकर आहे, नोकरासारखा रहा', अशा शब्दांत जैन यांनी सुनावल्याने अप्पर अधीक्षक सावंतांचा संताप अनावर होण्यापूर्वी पोलिस अधीक्षक वसंत कोरेगावकर यांनी बाजू सांभाळून घेत जैनांसह मोर्चेकऱ्यांना शांत केले. 

सहा वर्षे अन्‌ तपासाधिकारी "अकरा' 
घरकुलाची तक्रार दाखल झाल्यावर त्यावर एकामागून एक अकरा डीवायएसपी तपासाधिकारी म्हणून येऊन गेलेत. पण, कोणालाही या गुन्ह्याच्या फाइलची दोरी उघडण्याची संधी मिळाली नाही. मात्र, अकरावे तपासाधिकारी इशू सिंधू यास अपवाद ठरले. त्यांनी फाइल उघडली, अभ्यास केला आणि तपासाला नकार कळवला. तोही चक्क तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना. सोबतच हा गुन्हा एसआयटी, सीआयडीला वर्ग करण्याचा सल्ला दिला. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी आणि त्यानंतर चंद्रकांत कुंभार अशा दोघांनी सिंधूंची समजूत काढून याच फाइलमध्ये "संधी' असल्याचे सूतोवाच केल्यावर त्यांनी तपास हाती घेतला. तपासादरम्यान कोणतेही राजकीय अडथळे येणार नाहीत, याची खात्री मिळाल्यावर सिंधूंनी तपासाला सुरवात केली. 

रायसोनींचे पत्र अन्‌ सिंधूंचे वॉरंट 
महापालिका उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा महापौर प्रदीप रायसोनी वारंवार महापालिकेच्या लेटरहेडद्वारे घरकुल गुन्ह्याबाबत पोलिस दलास विचारणा करत होते. अशातच फाइलवरची धूळ बाजूला होऊन कागदांचा अभ्यास करून घरकुल घोटाळ्यातील तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना सिंधूंनी वॉरंट पाठवले. 27 डिसेंबर 2011 रोजी यावर अप्पर न्यायाधीशांच्या न्यायालयात कामकाज होऊन अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्जावर कामकाज झाले. तपासाधिकारी इशू सिंधूंनी तेव्हा केलेल्या पहिल्या न्यायालयीन युक्तिवादाने घरकुल तपासाची चिरेबंदी किती मजबूत असेल, यांचा अंदाज संशयित आरोपींना आला. पाच टन पुरावे, दस्तऐवज घेऊनच सिंधू न्यायालयात पोचले होते. परिणामी कोणालाही दिलासा मिळाला नाही. 

घरकुलची पहिली अटक 
घरकुल घोटाळ्यातील पहिले अटकसत्रात 28 जानेवारी 2012 रोजी सूर्यास्तादरम्यान तपासाधिकारी इशू सिंधू यांच्याकडून प्रदीप ग्यानचंद रायसोनी, पी. डी. काळे, राजा मयूर, नाना वाणी अशा चौघांना अटक करण्यात आली. अटकेच्यावेळी प्रदीप रायसोनी यांनी कुटुंबीयांना सांगितले, "संध्याकाळ पर्यंत परत येतो, चौकशीसाठी बोलावलं आहे.' मात्र, नंतर ते थेट कारागृहातच पोचले. सुरक्षेच्या दृष्टीने रायसोनींसह चौघांची अप्पर अधीक्षक सिंधूंच्या केबिन शेजारीच "प्रेरणा' या एसी सभागृहात विचारपूस चौकशी सुरू होती. मात्र, संशयितांतर्फे बाजू मांडताना वकिलांनी प्रेरणा हॉलमध्ये संशयितांना ठेवण्यावर आक्षेप नोंदवला. पोलिस कोठडीची गरज नसताना केवळ त्रास देण्यासाठी वारंवार कोठडी मागितली जात असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयातून कार्यालयात पोचताच सिंधूंनी चौघांना शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवाना केले. नंतर तेथे जाऊन चौकशी केली. त्यावेळी "साहेब, तिथंच चांगलं होतं', असे चौघे आरोपी म्हणायला लागल्यावर मात्र सिंधूंनी "तुमच्याच वकिलांनी कोठडीत चौकशीची मागणी केली. लवकरच इतर साथीदार येतील. सवय करून घ्या', असेही त्यांना सुनावले. 

अन्‌ दादांचा वजीर कोसळला 
सात, शिवाजीनगर या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानावरून जैनांचे साम्राज्य चालवले जात होते. त्या साम्राज्याचे चाणक्‍य आणि वजीर गणले जाणारे प्रदीप रायसोनी यांनी घरकुलच्या गुन्ह्यात कलम 164 नुसार जबाब देण्याचा निर्णय घेतला आणि दादांच्या साम्राज्याला जणू एका दिवसातच सुरुंग लागला. इकडून तिकडे संशयितांची पळापळ सुरू झाली. कारागृहावर जाऊन रायसोनींच्या मिन्नतवाऱ्या करण्याचा प्रयत्न पुन्हा जैन गटाच्या अंगलट आला. मग दबावतंत्रासह "करा वा मरा अशी अवस्था निर्माण झाली आणि पुढे जे व्हायचे तेच झाले. 

loading image
go to top