मनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

जळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये बुधवारी (ता. 16) महापालिकेच्या तीन बालवाडी सेविका सर्वेक्षणासाठी गेल्या असता त्यास विरोध करीत एक व्यक्ती या सेविकांच्या अंगावर चाकू घेऊन धावून आला. याबाबत आयुक्तांना या सेविकांनी भेट घेऊन निवेदन दिले. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिस संरक्षणात लसीकरण केले जाईल, असे आश्‍वासन यावेळी दिले. 

जळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये बुधवारी (ता. 16) महापालिकेच्या तीन बालवाडी सेविका सर्वेक्षणासाठी गेल्या असता त्यास विरोध करीत एक व्यक्ती या सेविकांच्या अंगावर चाकू घेऊन धावून आला. याबाबत आयुक्तांना या सेविकांनी भेट घेऊन निवेदन दिले. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिस संरक्षणात लसीकरण केले जाईल, असे आश्‍वासन यावेळी दिले. 
केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या रुबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम देशभर राबविला जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या क्षेत्रात महापालिकेतर्फे नऊ ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना रुबेला लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार बुधवारी शाळा क्रमांक सहाच्या बालवाडी मदतनीस रेखा निकुंभ, अर्चना खैरनार या दोघींना श्रीमती भिरूड यांनी शिवाजीनगर येथे सर्वेक्षणासाठी पाठविले होते. यादरम्यान गेंदालाल मिल परिसरातील एका वस्तीत गेल्या असता या लसीकरणास एका अज्ञात तरुणाने विरोध केला. मदतनिसांना शिवीगाळ करीत थेट हातात चाकू घेऊन महिलांच्या अंगावर धावून गेला. तेथील काही महिलांनी दोघींना शिवीगाळ करत "पळून जा, आता चाकू आहे नाही तर तो तलवार घेऊन येईल' अशी धमकी दिल्याची माहिती रेखा निकुंभ व अर्चना खैरनार यांनी दिली. 

वरिष्ठाकांडून घटनेकडे दुर्लक्ष 
दोघा सेविकांनी यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन डॉ. सायली पवार, श्रीमती भिरूड यांना आपबिती सांगितली. मात्र, त्यांनी या दोघींची बाजू ऐकून न घेता त्यांना पुन्हा सर्वेक्षणासाठी पाठविले. तसेच वरिष्ठांना देखील या प्रकाराबाबत कळविले नाही. 

शेवटी आयुक्तांकडे धाव 
आपली तक्रार कोणी ऐकून घेत नसल्याचे पाहून आज महापालिका बालवाडीच्या सर्व 19 मदतनीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आल्या. यावेळी तीन-चार तास त्यांना आयुक्तांच्या दालनाबाहेर थांबावे लागले. भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांना फोन लावल्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत लगेच महापालिकेत येऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांना फोन लावून बोलावून घेतले. 

आयुक्तांचे आश्‍वासन 
बालवाडी सेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. घटना सांगताना दोघा महिलांना रडू कोसळले होते. आयुक्तांनी सर्व सेविकांना संवेदनशील भागातील सर्वेक्षणाच्या कामांसाठी पोलिस संरक्षण घेण्यासह संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी यांना दिले. 
 
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अजब उत्तर 
दरम्यान, या महिला आयुक्त कार्यालयात नगरसेविका बेंडाळे आल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी तेथे आले. यावेळी महिलांनी रावलानी यांना सर्वेक्षण करताना पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. यावेळी डॉ. रावलानी यांनी "मी स्वतः सकाळपासून फिरतो, मलाच संरक्षण मिळत नाही, तर.. तुम्हाला कुठून देऊ' असे अजब उत्तर दिल्याचे या सेविकांनी सांगितले. 
 
धर्मगुरू, शिक्षक आदींसोबत बैठक घेत लसीकरणाचे महत्त्व सांगितले आहे. तरी बुधवारी बालवाडी सेविकांसोबत घडलेली घटना गंभीर आहे. संवेदनशील परिसरात सर्वेक्षणाचे काम पोलिस बंदोबस्तात केले जाईल. तसेच हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
- डॉ. चंद्रकांत डांगे, आयुक्‍त. 

Web Title: marathi news jalgaon balwadi sevika attack