अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होणार समावेशन: "सकाळ'च्या वृत्त मालिकेचे यश

अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होणार समावेशन: "सकाळ'च्या वृत्त मालिकेचे यश

भडगाव : "सकाळ'ने राज्यातील 738 अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्त मालिकेला यश आले आहे. शासनाने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तर राज्याच्या आरोग्य विभागाने गट "ब' पदाबाबत तातडीने माहिती देण्यासंदर्भात आरोग्य उपसंचालकाना पत्र दिले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाची एक तपापासूनची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 
एक तपापासून समावेशनाबाबत राज्यातील 738 वैद्यकीय अधिकारी शासन दरबारी खेटा मारत होते. मात्र, प्रत्येकवेळी राज्यकर्त्यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या. 29 ऑगस्ट 2017 ला राज्यातील 738 अस्थायी "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट "ब' पदावर समावेशनाबाबत राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. मात्र, गट "ब' वैद्यकीय अधिकारी हे पद लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येत असल्याने आरोग्य विभागाने ही पदे वगळण्याबाबत लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवला. त्यांनी या प्रस्तावात तीन वेळा त्रुटी काढल्या. त्या त्रुटी आरोग्य विभागाने पूर्ण केल्या. मात्र, 19 जुलै 2018 ला लोकसेवा आयोगाने समांतर आरक्षणास यामुळे बाधा निर्माण होईल, असे कारण देत अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समायोजनाच्या प्रस्तावास नकार दिला. त्यामुळे मंत्रिमंडळाने समायोजनाबाबत निर्णय होऊन ही राज्यातील दुर्गम भागात सेवा देणारे 738 वैद्यकीय अधिकाऱ्यांना समायोजनाची प्रतीक्षा होती. 

अधिसूचना प्रसिद्ध 
लोकसेवा आयोगाने जुलै 2018 मध्ये अस्थायी "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनास नकार दिल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे समावेशनाबाबत प्रस्ताव दाखल केला होता. त्याअनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या 29 नोव्हेंबर 2018 च्या बैठकीत खास बाब म्हणून 738 अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक वेळ समावेशनाचा निर्णय घेतला. त्या निर्णयाची अधिसूचना प्रकाशित झाली आहे. लवकर त्यांचे समावेशन होणार आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना समावेशनापासून पुढील दहा वर्षे आदिवासी व बिगर आदिवासी अशा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणे बंधनकारक केले आहे. 

आरोग्य उपसंचालना पत्र 
राज्यातील अस्थायी "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एकवेळ समावेशनाबाबत मंत्री मंडळाने निर्णय घेतल्यानंतर 15 जानेवारीला आरोग्य विभागाने राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालकाना मंजूर असलेले गट "ब' पदे, भरलेली पदे, रिक्त पदाची तातडीने माहिती देण्याबाबत आदेशित केले आहे. त्याअनुषंगाने माहिती संकलनाचे काम सुरू आहे. काही दिवसातच अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाची प्रतीक्षा संपुष्टात येऊन त्यांचे समावेशन होणार आहे. 
 
"सकाळ'च्या वृत्त मालिकेला यश 
"सकाळ'ने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यातील दुर्गम, आदिवासी भागात सेवा देणाऱ्या अस्थायी "बीएएमएस' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. "अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यथा' या मथळ्याखाली सप्टेंबरमध्ये सहा भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही हा विषय लावून धरला. या वृत्तमालिकेची दखल घेत 29 नोव्हेंबरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट "ब' या पदावर एकवेळ समावेशनाबाबत निर्णय घेतला. या निर्णयाने राज्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी "सकाळ'च्या जागल्याच्या भूमिकेचे कौतुक करीत आभार मानले आहे. 
 
एका तपापासून समावेशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट "ब' पदावर समावेशनाच्या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. मिळालेल्या न्यायाचा आनंद आहे. "सकाळ'चा या यशात मोठा वाटा असल्याने त्यांचेही मनापासून आभार. 
-डॉ. राष्ट्रपाल अहिरे, सदस्य : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मॅग्मो आयुर्वेदिक संघटना. 
 
विभागनिहाय कार्यरत अस्थायी वैद्यकीय अधिकारी 
विभाग अस्थायी वैद्यकीय अधिकारी 
नाशिक ................ 229 
पुणे ..................... 51 
कोल्हापूर .............. 38 
ठाणे ................... 63 
औरंगाबाद ............ 11 
लातूर .................. 11 
अकोला ............... 194 
नागपूर ................. 141 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com