वरुणराजाच्या कृपादृष्टीसाठी "कुवारी पंगत'! 

वरुणराजाच्या कृपादृष्टीसाठी "कुवारी पंगत'! 

कजगाव (ता. भडगाव) ः यावर्षी समाधानकारक पाऊस असला, तरी परंपरागत वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी यासाठी सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली अनोखी "कुवारी पंगत' आज देऊन वरुणराजाची आराधना करण्यात आली. 

"कुवारी पंगत'ची आख्यायिका 
जुन्या काळात साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी येथील गढीमध्ये बुरुज बनवून भाईकनशा फकीर बाबा आपल्या रखवालदारासह वास्तव्यास राहिले. त्या काळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गावकरी भाईकनशा फकीर बाबांच्या बुरुजाजवळ जमले. बाबा ध्यानस्थ बसले होते. काही क्षणांतच बाबांची दृष्टी गावकऱ्यांवर पडली. संपूर्ण गावातून यथाशक्ती गाववर्गणी रोख स्वरूपात किंवा अन्नधान्य स्वरूपात जमा करा आणि संपूर्ण गावात कुवारी बालकांना गोड भाताची पंगत द्या, असे सांगितले व ते पुन्हा ध्यानस्थ झाले. बाबांच्या आदेशानुसार गावकऱ्यांनी गाववर्गणी केली आणि श्रावण महिना सुरू असल्याने गुरुवारी "कुवारी पंगत'चे आयोजन केले. ज्यात गावातील बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. "कुवारी पंगत' झाल्यानंतर काही वेळातच पाऊस झाला. संपूर्ण गावात आनंदोत्सव झाला. दुष्काळी परिस्थिती बदलली, सर्वत्र शिवार फुलले आणि सारे गावकरी बाबांच्या बुरुजाजवळ जमले व बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हापासून गावकऱ्यांनी "कुवारी पंगत'ची प्रथा सुरू ठेवून ती आजतागायत कायम आहे. दमदार पाऊस झाला किंवा पावसाने दडी मारली, तरी "कुवारी पंगत'चे आयोजन दरवर्षी केले जाते. आज श्रावण महिन्याचा गुरुवार असल्याने "कुवारी पंगत'चे आयोजन करण्यात आले होते. 

उरूसचे आयोजन 
भाईकनशा फकीर बाबांनी जिवंत समाधी घेतली होती. ते समाधिस्थळ आज हिंदू- मुस्लिमांचे देवस्थान बनले आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांच्या नावाचा उरूस गावात भरवला जातो. यानिमित्त कुस्त्यांची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. "कुवारी पंगत'साठी गावातील तरुणांनी आठवड्यापासून घराघरांतून यथाशक्ती तांदूळ, कडधान्य व साखर जमा केली. व्यापाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य केले. आज सकाळी तांदळाचा गोड भात तयार करून गावातील कुवाऱ्या मुलामुलींना त्याचा लाभ देण्यात आला. सुरवातीला भूषण पाटील यांच्या कुटुंबीयांनी दर्ग्यावर शाल चढविली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण पाटील, राजेंद्र पाटील, शरद पाटील, नीलेश पवार, विलास पाटील, सुनील पाटील, नीलेश महाले, जयपाल पाटील, कुमार पाटील, नाना धोबी, सत्यम टेलर, रहेमान शाह, राजू शेख, एकनाथ पाटील, तुषार अमृतकार, संदीप पाटील, छोटू जैन, प्रकाश जैन, ज्ञानेश्‍वर पवार, नितीन पाटील, चिंतामण साठे, गोपाल पवार, राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com