बऱ्हाणपूरचा ऐतिहासिक कुंडी भंडारा कोरडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

रावेर : यंदा कमी पडलेल्या पावसाचा आणि दुष्काळाचा फटका मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या कुंडी भंडाऱ्यालाही बसला आहे. यंदा या ऐतिहासिक कुंडी भंडाऱ्यात एक फुटही पाणी नसून वर्षभरापासून येथून लालबाग येथे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. कुंडी भंडाऱ्याची जलपातळी वाढविण्यासाठी युनेस्को आणि केंद्र सरकारनेही लक्ष घातले आहे. 

रावेर : यंदा कमी पडलेल्या पावसाचा आणि दुष्काळाचा फटका मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या कुंडी भंडाऱ्यालाही बसला आहे. यंदा या ऐतिहासिक कुंडी भंडाऱ्यात एक फुटही पाणी नसून वर्षभरापासून येथून लालबाग येथे होणारा पाणीपुरवठा बंद आहे. कुंडी भंडाऱ्याची जलपातळी वाढविण्यासाठी युनेस्को आणि केंद्र सरकारनेही लक्ष घातले आहे. 
सन १६१५ मध्ये म्हणजे आजपासून ४०४ वर्षांपूर्वी अब्दुल रहीम खान यांनी बऱ्हाणपूर येथे या आगळ्यावेगळ्या जलप्रणालीची निर्मिती केली. जगात अशी जलप्रणाली भारतात केवळ बऱ्हाणपूर येथे असून, जगातील इराक आणि इराणमध्ये आहे. जमिनीखाली सुमारे शंभर फूट खाली खड्डा खोदून येथे पाझरणारे पाणी नैसर्गिक आणि हवेच्या दाबाचा वापर करून बऱ्हाणपूर येथे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वाहून नेले जात होते. या पाण्याचा उपयोग बऱ्हाणपूर शहरासाठी आणि त्या भागातील सैनिकांसाठी पिण्यासाठी होत असे. या भागात जमिनीत असलेल्या क्षारांमुळे येथून मिळणारे पाणी अतिशय शुद्ध असते. सुमारे वीस वर्षांपूर्वी या जलप्रणालीचा उपयोग शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी होत होता; मात्र अलीकडे पाणीपातळी घसरल्याने बऱ्हाणपूर शहराचे उपनगर असलेल्या लालबाग भागासाठी याचा वापर होत असे. मात्र सुमारे एक वर्षापासून या जलप्रणालीची पाणी पातळी खूपच घसरल्याने हा पाणीपुरवठाही बंद आहे. सध्या या जलप्रणालीपासून पाचव्या क्रमांकाच्या विहिरीत एक फूटही पाणीपातळी उपलब्ध नसल्याने त्या पुढील शेकडो विहिरी कोरड्या पडल्या आहेत. 
 
जलपातळी वाढविण्यासाठी 
केंद्रासह ‘युनेस्को’चा पुढाकार 

याबाबत तेथील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंदूर येथून पर्यावरण तज्ज्ञ भानु पटेल यांना पाहणीसाठी बोलावले होते. जलप्रणालीच्या आणि सातपुड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यास पाणी जमिनीत जिरवून या प्रणालीची पातळी पुन्हा वाढवता येऊ शकेल, असा अभिप्राय श्री. पटेल यांनी दिला आहे. या ऐतिहासिक जलप्रणालीची पातळी वाढविण्यासाठी आणि झाडे लावण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला असून, ‘युनेस्को’ने ही यात लक्ष घातले आहे. आगामी काळात मध्यप्रदेशातील वनविभाग त्या परिसरात झाडे लावण्यासाठी अभियान हाती घेणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon bharanpur kundi bajar