त्या' मुलीचे लचके तोडणारा भोंदूबाबा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जळगाव : समतानगरातील आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (13 जून) उघडकीस आली. समतानगर परिसरातीलच टेकडीवरील उकिरड्यावर गोणपाटात कोंबून फेकलेला मृतदेह आढळून आला होता. घटना घडल्यापासून संशयित आनंदा तात्याराव साळुंखे ऊर्फ आदेशबाबा पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस पथके त्याच्या मागावर होती. आज पहाटे चारला पोलिसांची चाहूल लागताच नागझिरी नदीपात्रातून पळत सुटलेल्या आदेशबाबावर पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांनी झडप घालून त्याला अटक केली. 

जळगाव : समतानगरातील आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (13 जून) उघडकीस आली. समतानगर परिसरातीलच टेकडीवरील उकिरड्यावर गोणपाटात कोंबून फेकलेला मृतदेह आढळून आला होता. घटना घडल्यापासून संशयित आनंदा तात्याराव साळुंखे ऊर्फ आदेशबाबा पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस पथके त्याच्या मागावर होती. आज पहाटे चारला पोलिसांची चाहूल लागताच नागझिरी नदीपात्रातून पळत सुटलेल्या आदेशबाबावर पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांनी झडप घालून त्याला अटक केली. 
दरम्यान, आदल्या रात्री मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आनंदा तात्याराव साळुंखे ऊर्फ आदेशबाबाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. 
समतानगर झोपडपट्टीत कोल्हेनगरच्या दिशेने मागील बाजूस टेकडीवर सकाळी आठवर्षीय "निर्भया'चा मृतदेह पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह निरीक्षक बापू रोहोम, अनिरुद्ध अढाव यांच्यासह उपविभागातील "डीबी'ने हालचाली गतिमान केल्या. पीडिता बेपत्ता झाली, त्याच दिवशी तिच्या आईने आदेशबाबावर संशय व्यक्त केल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिस पथकांकडून गिरणा नदीपात्र, निमखेडी, बांभोरी, नागझिरीसह टाकरखेडा (ता. एरंडोल), शिरसोली, मोहाडी वनक्षेत्रात शोध सुरू होता. पहाटे चारच्या सुमारास संशयिताला पोलिस आल्याची चाहूल लागली व तो गिरणा नदीच्या खोऱ्यात पळत सुटला. पळणारा आनंदा तात्याराव साळुंखे ऊर्फ आदेशबाबाच असल्याचे समजल्यानंतर पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांनी त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. 

धावत सुटल्यानंतर झटापट 
नागझिरी येथील काही ग्रामस्थ आणि पोलिस आदेशाबाबाच्या मार्गावर असतानाच तो खड्ड्यात पडला. त्यात त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले असून, त्याच्यावर झडप घालताच उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे, निरीक्षक रोहोम, अनिरुद्ध अढाव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथक धडकले. चारही बाजूंनी आपण तावडीत सापडल्याचे समजताच आदेशबाबाची झटापट शांत झाली. 

अवघ्या 24 तासांत अटक 
घडल्या प्रकरणात 12 जूनला रात्री मुलीचे अपहरण झाल्याचे कळल्यापासून पोलिस संशयिताचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडताच पोलिस दलाचे धाबे दणाणले. संशयित तोच असल्याच्या खात्रीसाठी श्री. सांगळे यांनी सर्व पुरावे तपासूनच त्याचा पिच्छा पुरवला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप बघता रात्रंदिवस मिळालेच खायला तर मिळाले; अन्यथा उपाशीपोटीच संशयिताचा शोध घेतला. शेतशिवारातील सालदार, रानमाळावरील मेंढपाळांना मोबाईलमध्ये फोटो दाखवत आदेशबाबाचा अवघ्या 24 तासांत शोध लावून त्याला अटक करण्यात आली. 

नदीमार्गे बांभोरी पूल ते नागझिरी 
पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. नंतर तिचा गळा आवळून खून केला. तत्पूर्वी, तिचा एक हातही झटापटीत मोडला. अंगावर प्रतिकाराच्या खुणा होत्या. क्रूर पद्धतीने खून करून भोंदूबाबा आनंदा साळुंखे पाळधीला जाऊन बांभोरीला परतला. तेथून नदीपात्रातून टाकरखेडा, सौखेडा, दहिदुल्ले, कांताई बंधारा अशी भटकंती करीत नागईजोगईपर्यंत पोचला होता. 

पथकाला रिवॉर्ड 
संशयिताला पहाटेच्या काळोखात पकडणारे पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांना वैयक्तिक पाच हजार व संशयिताच्या मागावर असलेल्या "डीबी' पथकांना दहा हजारांचे संयुक्त रिवॉर्ड पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जाहीर केले. 

Web Title: marathi news jalgaon bhondubaba arest