शहरातील हजारावर प्रॉपर्टी कार्डांमध्ये घोळ!; नगर भूमापनातील अनागोंदी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जळगाव : नगर भूमापन कार्यालयातील परीरक्षण भूमापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर या कार्यालयातील घोळ समोर येऊ लागला आहे. शहरातील एक हजारापेक्षा अधिक प्रॉपर्टी कार्डांमध्ये घोळ असून, त्याआधारे नागरिकांना त्रास दिला जात असल्याची चर्चा समोर येत आहे. तर दुसरीकडे आज झालेल्या "एसीबी'च्या कारवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

जळगाव : नगर भूमापन कार्यालयातील परीरक्षण भूमापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर या कार्यालयातील घोळ समोर येऊ लागला आहे. शहरातील एक हजारापेक्षा अधिक प्रॉपर्टी कार्डांमध्ये घोळ असून, त्याआधारे नागरिकांना त्रास दिला जात असल्याची चर्चा समोर येत आहे. तर दुसरीकडे आज झालेल्या "एसीबी'च्या कारवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
विविध वादग्रस्त विषयांवरून नेहमीच चर्चेच्या ठरलेल्या नगर भूमापन कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रॉपर्टी कार्डातील दुरुस्तीसाठी दहा हजार रुपये लाच मागणाऱ्या परीरक्षण भूमापक संगीता वर्दे यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कार्यालय व तहसील परिसरात चांगलीच खळबळ उडाली. मात्र, अशाप्रकारच्या कारवाईमुळे नगर भूमापन कार्यालयातील अनागोंदीची चर्चा पुन्हा एकदा तीव्रपणे सुरू झाली आहे. 

हजारावर प्रॉपर्टी कार्डांमध्ये घोळ 
गेल्या वर्षांत नगर भूमापन कार्यालयातील प्रॉपर्टी कार्डांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारीही झाल्या. प्रॉपर्टी कार्डात परस्पर दुरुस्ती करून एखाद्या कार्डावरील क्षेत्र कमी तर एखाद्या कार्डवर ते वाढविले जाते. ज्या कार्डावरील क्षेत्र कमी होते, त्या मिळकतधारकास कार्ड पाहिल्यानंतर ते लक्षात येते आणि नंतर त्याच्या चकरा सुरू होतात. असे अनेक प्रकार घडत असून त्यातील काही प्रकरणांची चौकशीही सुरू आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जवळपास हजारावर कार्डांमध्ये अशा प्रकारचे घोळ करून ठेवल्याचेही समजते. 

अनागोंदीचा कळस 
कार्डांमधील घोळ व अन्य कामांसाठी मालमत्ताधारकांना अक्षरश: अनेक चकरा मारायला लावून वेठीस धरले जाते. नगर भूमापनातील हा कारभार राजरोसपणे सुरू असतो. सर्रास लाच मागण्याचे प्रकार होतात, मात्र त्याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्यातूनच आजची कारवाई घडल्याचे बोलले जात आहे. 

उपसंचालकांनी घेतली होती झडती 
भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक मिलिंद चव्हाण नुकतेच जळगाव दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी भूमिअभिलेखसह नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनाही ही अनागोंदी लक्षात आल्यानंतर त्यांनी झाडाझडती घेतली होती. 

डिजिटायझेशन आवश्‍यक 
नगर भूमापन कार्यालयाकडे नोंदी असलेल्या प्रॉपर्टी कार्डांचे डिजिटायझेशन होणे गरजेचे आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावातील काम अत्यंत संथगतीने होत आहे. डिजिटायझेशनचे 20 टक्के कामही पूर्ण झालेले नाही. प्रॉपर्टी कार्ड पाहण्यासाठी मिळकतधारक अनेक वर्षे या कार्यालयाकडे फिरकत नाही, त्यामुळे कार्डांमध्ये घोळाचे प्रकार समोर येतात. हे कार्ड ऑनलाइन पाहायला मिळाले तर त्यात असे घोळ होणार नाही, म्हणून सातबारा उताऱ्यासारखे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध झाले पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon bhumapan properti card