भुसावळात पोलिसांची दबंगगिरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

भुसावळ : मद्यधुंद अवस्थेत जीम चालकास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्‍या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्‍यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश माळी व शशी तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी पोलिसांची नावे आहेत. 

भुसावळ : मद्यधुंद अवस्थेत जीम चालकास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्‍या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्‍यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश माळी व शशी तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी पोलिसांची नावे आहेत. 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी व शशी तायडे हे दोन्ही कर्मचारी मद्यप्राशन करून दुचाकीने रेल्वे स्थानकाजवळील दर्ग्याजवळ आल्यानंतर तेथे जीम चालक तथा तक्रारदार जुबेरखान नईम खान पठाण (वय ३३, ग्रीन पार्क, भुसावळ) हा उभा असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी पठाण यांच्या पायाजवळ नेत पुढील चाकाचा धक्का दिल्याची घटना रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. यानंतर पठाण यांनी ‘क्यू मारा भाई’ असे विचारल्याचा राग आल्याने या पोलिस कर्मचाऱ्याने दिखता नही क्या, हम पुलिस है, असे सांगत दुचाकीखाली उतरून पठाण यांच्या डाव्या व उजव्या कानात मारल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यानंतर या पोलिसांनी अश्‍लील शब्दात शिवीगाळ केली व घटनास्थळावरून काढता पाय घेतला. घटनास्थळी सरफराज खान व आमीन खान हे तक्रारदाराचे दोन्ही मित्र होते. त्यांनी या घटनेचे व्हिडिओचित्रीकरण केले तर या घटनेनंतर पठाण यांनी जिल्हा रुग्णालयात जावून उपचार घेतले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना घटनेची माहिती दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात बाजारपेठ पोलिसांनी जावून तक्रारदाराचा जवाब नोंदवत मध्यरात्री पठाण यांच्या फिर्यादीनुसार दोघाही संशयित आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघाही पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. 
 
जखमीवर दबाव 
मारहाण केल्यानंतर जखमी जुबेरखान पठाण यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर अनेकांचे फोन येत असून दबाव आणला जात असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

कारवाईसाठी प्रयत्नशील 
दरम्यान पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमीची पाहणी केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यातील आरोपी हे पोलिस कर्मचारी असले म्हणून त्यांना कुठलेही अभय न देता, त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस निरीक्षक देविदास पवार हे प्रयत्नशील आहेत. 

Web Title: marathi news jalgaon bhusawal police dabang