भुसावळला रंगतदार तिरंगी लढतीची शक्‍यता! 

भुसावळला रंगतदार तिरंगी लढतीची शक्‍यता! 

भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता आहे. 

भुसावळ विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या नेहमीच जास्त असते. यंदा भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने त्यांनी भेटीगाठी, बैठका यांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचेही त्यांनी यशस्वी आयोजन केले. मात्र त्यांना डॉ. मधू मानवतकर या स्पर्धक आहेत. दहा वर्षांपूर्वी भुसावळ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यापासूनच मानवतकर यांचे डॉ. राजेश मानवतकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र विचारांती त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रज्ञा सूर्य प्रतिष्ठान, डॉ. मानवतकर बहुद्देशीय संस्था यामार्फत केलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यातून त्यांनी आपला कॅनव्हास वाढवला. डॉ. मधू मानवतकर या स्त्री रोग तज्ज्ञ असून त्यांनी जेसीआय, इनरव्हील क्‍लब अशा सामाजिक संघटनांमध्ये ही काम केले आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरिबांना साहित्य वाटप आदी उपक्रम राबविल्याने त्या चर्चेत आहेत. शिवाय त्यांचे सासरे डॉ. तुकाराम मानवतकर हे वरणगाव परिसरात चांगलेच परिचित आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच हा त्यांचा निर्धार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या प्रसंगी मानवतकर दांपत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर तसेच स्थानिक पातळीवरही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, तरी त्यांनी पर्याय देखील तयार ठेवले आहेत. एकतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून किंवा वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवू शकतात. त्यांचे निकटवर्तीय तसेच वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी या संदर्भात खासगी बोलत असतात. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे हे देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही वर्षापासून राजकारणातील वाटचाल सुरू केली आहे. भुसावळ तालुका अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. तर गेल्या चार वर्षांपासून ठामपणे आपण निवडणूक लढवणार आहोत असं जाहीरपणे सांगणारे जगन सोनवणे हे रिपब्लिकन पक्षाच्या प्रा. कवाडे गटाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वतःची ओडबसम क्रांती ही संघटनाही स्थापन करून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करू पाहत आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरीही त्यांनी शहरात मोठे फ्लेक्‍स लावले असून त्यावर विश्वास मी...विकास मी...या मथळ्याखाली मजकूर लिहिलेला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद मिळालेले सतीश घुले हे देखील इच्छुक आहेत. ट्रॅव्हल्स व्यावसायिक म्हणून ते परिचित असलेतरी त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नाही. मात्र माजी आमदार संतोष चौधरी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. आणखी काही नावे चर्चेत असली तरी संभाव्य लढत तिरंगीच होणार हे निश्‍चित आहे. 
वंचितमधून एमआयएम बाहेर पडल्याने भुसावळ मधूनही ते आपला उमेदवार उभा करण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जगन सोनवणे यांनी "एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन निवडणुकीविषयी चर्चा केली. दुसरीकडे शिवसेना व कॉंग्रेसही भुसावळच्या जागेसाठी दावा करीत आहे. मात्र त्याला मर्यादा आहेत. यंदा बहुतेक पक्षांचे उमेदवार स्थानिकच असतील हे निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com