जळगावकर रिचवणार यंदा 50 लाख लिटर बिअर 

जळगावकर रिचवणार यंदा 50 लाख लिटर बिअर 

जळगाव : "पिने वालो को पिने का बहाना चाहिए...' या हिंदी चित्रपटातील गीताप्रमाणे जरी मद्यपान करणाऱ्यांना कुठलीही काळ-वेळ अथवा मुहूर्त लागत नसला, तरी उन्हाळ्यातील चार महिने बिअरचा खप प्रचंड वाढलेला असतो. गेल्या वर्षी जळगावकरांनी तब्बल 41 लाख 10 हजार 543 लिटर बिअर रिचविली. यंदा हा खप 50 लाख लिटरपेक्षा अधिक जाण्याची शक्‍यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. जळगावचे पन्नाशी गाठणारे तापमान आणि येऊ घातलेला निवडणुकांचा काळ पाहता संभाव्य वाढ होण्याला दुजोराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. गेल्या वर्षी पाच कोटी 45 लाख 76 हजार 18 रुपये महसूल शासनाला मिळाला. त्यातही निश्‍चितपणे आणखी वाढ होणार आहे. 
जळगाव जिल्ह्याचे तापमान मार्चच्या मध्यापासूनच उच्चांकी गाठते. त्यात एप्रिल, मे व जून हे अतिशय कडक उन्हाचे असतात. या काळात बिअरला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सहा लाख 17 हजार लिटर बिअर रिचविली गेली, तर मेमध्ये हाच आकडा सहा लाख 86 हजार लिटरवर पोहोचला आणि जूनमध्ये चार लाख 76 हजार लिटर बिअर रिचविली गेली. 31 मार्चअखेर वर्षभरात 41 लाख 10 हजार 543 लिटर बिअर जळगावकरांनी संपवली. देशी दारूची वर्षभरात 92 लाख पाच हजार लिटर उच्चांकी विक्री झाली. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 17.95 टक्के कमी आहे. जळगाव जिल्ह्यात 393 बिअरबार, 39 वाईन शॉप, तर 150 देशी दारू विक्रीची दुकाने आहेत. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षातील राज्य उत्पादनशुल्क विभाग, जळगावच्या कामगिरीचा आढावा घेताना 2018-19 या वर्षात या विभागाने पाच कोटी 45 लाख रुपये महसूल कमी मिळविला, तर 2017-18 या वर्षात हाच आकडा 13 कोटी 60 लाख रुपये होता. 

विदेशी मद्य विक्रीत वाढ 
राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या कारवाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दाखल झालेले गुन्हे पाहता बिअरच्या बरोबरीने विदेशी मद्याचीही मागणी वाढल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात पाच लाख 22 हजार लिटर दारू विक्री झाली. सप्टेंबर, फेब्रुवारी व मार्च या महिन्यांत विदेशी दारू विक्री 10 टक्‍क्‍यांहून अधिक वाढली. मात्र, "वाईन'ची विक्री अत्यल्प झाली. 

उन्हाळ्यात बिअरचा खप अधिक 
वर्षभरात आठ महिने बिअरचा खप नियंत्रणात असतो. सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बिअर विक्री अत्यल्प असते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान एकदमच कमी विक्रीवर आकडे पोहोचतात. महाविद्यालयीन परीक्षांचा काळ संपलेला असताना त्याच काळात लग्नसराई सुरू होते. नवखे तरुण माइल्ड बिअरने सुरवात करतात, तर उन्हाळ्यात जळगावचे तापमान पन्नाशी गाठत असल्याने एरवी महागड्या ब्रॅंडची दारू रिचविणारेही बिअरकडे वळतात. परिणामी, यंदा बिअरचा खप अधिक होण्याचे भाकीत विक्रेत्यांनी केले असून, यंदाची विक्री 50 ते 55 लाख लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

निवडणूक काळात खप वाढणार 
यंदा ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकीचा बार उडणार असल्याने त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यकर्त्यांसाठी दारूचे पाट वाहते करण्याची परंपरा आहे. फुकटाची मिळाली तर दारू पिणारेही नाक मुरडतच "उन्हाळ्यात त्रास नको' असे म्हणत बिअरची मागणी करतात. सलग दोन मोठ्या निवडणुकांचा हा काळ असल्याने 50 लाख लिटरचा संभाव्य आकडा आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे फटका 
गेल्या वर्षी अर्थात एप्रिल 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगत 500 मीटरच्या आतील सर्व बिअरबार, दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. यामुळे जवळपास सात महिने शहरातील बहुतांश बिअरबार, दारू विक्रीची दुकाने बंद होती. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये ही बंदी उठविली गेल्यावर बिअरबार, दारू विक्रीची दुकाने पुन्हा सुरू झाली. याचा प्रचंड मोठा फटका राज्याच्या महसुलास बसला. 


वर्षनिहाय तुलनात्मक तपशील 
सन 2017 
देशी मद्य ः 78 लाख 42 हजार लिटर 
विदेशी मद्य ः 27 लाख 33 हजार लिटर 
बिअर ः 34 लाख 33 हजार लिटर 
वाईन ः 27 हजार लिटर 
एकूण प्राप्त महसूल ः 13 कोटी 60 लाख 13 हजार 17 रुपये 

सन 2018 
देशी मद्य ः 92 लाख पाच हजार लिटर 
विदेशी मद्य ः 35 लाख 22 हजार लिटर 
बिअर ः 39 लाख 55 हजार लिटर 
वाईन ः चार हजार लिटर 
एकूण प्राप्त महसूल ः पाच कोटी 45 लाख 76 हजार 18 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com