वर्चस्वाच्या संघर्षात दोन जागांचे "समर्पण' 

वर्चस्वाच्या संघर्षात दोन जागांचे "समर्पण' 

"शत प्रतिशत'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या जळगाव जिल्ह्यात भाजपला 2014 च्या तुलनेत यंदाच्या विधानसभेत मुक्ताईनगर व रावेर या दोन जागा गमवाव्या लागल्या. म्हणायला दोन जागा असल्या तरी प्रत्यक्षात लढविलेली अमळनेर आणि जिल्ह्याला लागून असलेल्या मलकापूरच्या जागेवरही पाणी सोडावे लागले. भाजपचे "कमिटेड' मतं असलेल्या हक्काच्या जागांवर असे का व्हावे? याचे उत्तर एका वाक्‍यात भाजपच्याच भाषेत द्यायचे झाल्यास "गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत वर्चस्वाच्या लढाईतून या जागांचे "समर्पण' दिले..' असेच द्यावे लागेल. 


गेल्या चार दशकांत जळगाव जिल्ह्यात भाजपची मोट बांधण्याचे काम एकनाथराव खडसेंनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन अत्यंत परिश्रमपूर्वक केले. या काळात "शत प्रतिशत' ही संकल्पना याच जिल्ह्याने प्रत्यक्षात उतरवली, आणि 2014 ला राज्यात भाजपची सत्ता येण्यात या उत्तर महाराष्ट्राने मोलाचे योगदान दिले. सत्ताप्राप्तीनंतर मात्र शिस्तप्रिय भाजप कॉंग्रेसच्या वाटेवर चालू लागला. अवघ्या दीड वर्षात खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला, आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यात पक्षांतर्गत वर्चस्वाची लढाईच सुरू झाली. 

खडसेंनी राजीनामा देण्यामागे भोसरी जमीन खरेदीच्या कथित प्रकरणाचे कारण सांगितले जात असले तरी खरी कारणे वेगळीच होती, ती आजवर बाहेर येऊ शकली नाहीत. जून 2016मध्ये खडसेंनी राजीनामा दिला, त्याचवेळी "आता खडसे नकोच..' हे पक्षश्रेष्ठींनी नक्की केले होते. नंतरच्या काळात वेगवेगळ्या निमित्ताने खडसेंना डावलणे व पर्यायाने निष्प्रभ ठरवणे सुरू राहिले. या वातावरणात शांत बसतील ते खडसे कसले? म्हणून ते आपली खदखद जाहीरपणे व्यक्त करत राहिले. 

तीन जागांवर परिणाम 
एप्रिल- मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्नुषा रक्षा खडसेंच्या उमेदवारीसाठी खडसेंना संघर्ष करावा लागला, तेव्हाच खडसेंची उमेदवारीही धोक्‍यात असल्याचे चित्र दिसले. झालेही तेच.. खडसेंना उमेदवारी नाकारून पक्षाने "तुम्ही नको, पण तुम्ही सांगाल तो उमेदवार' अशी भूमिका घेत त्यांची कोंडी केली. आणि त्याचा परिणाम रावेर व मुक्ताईनगरला दिसून आला. घरातील उमेदवार दिला म्हणून मुक्ताईनगरातील स्वकीय खडसेंवर नाराज झाले आणि खडसेंना उमेदवारी नाकारली म्हणून त्यांचे समर्थक व समाज पक्षावर नाराज झाला. त्याचे पडसाद मलकापूरपर्यंत उमटले. प्रतिस्पर्धी उमेदवारच तुल्यबळ नसल्याने भुसावळ व जळगाव शहराची लढत एकतर्फी झाली. उमेदवार तगडा असता तर याठिकाणी चुरस निर्माण झाली असती.. 

..तेव्हाच "रावेर' गमावले 
मुक्ताईनगरात खडसेंशिवाय अन्य कुणालाही जनता स्वीकारत नाही, हे दिसून आले. खडसेंचे कट्टर विरोधक म्हणून चंद्रकांत पाटलांना शिवसेनेसोबतच कॉंग्रेस-राष्ट्रवादीची उघडपणे व भाजपतील खडसेंवर नाराज असलेल्यांची छुपी मदत झाली असेल, हे वेगळे सांगायची गरज नाही. रावेरमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खुल्या वाहनावर गिरीश महाजन व खडसे विरोधक चंद्रकांत पाटील स्वार झाले तेव्हाच हरिभाऊ जावळेंचा पराभव नक्की झाला होता. 44 हजारांवर मते घेणारे महाजनांचे समर्थक अनिल चौधरींनी या पराभवाला अधिक मोठे केले, एवढेच. 

अमळनेरचा प्रयोग फसला 
अमळनेरमध्ये विद्यमान अपक्ष आमदाराला उमेदवारीची "रेड कार्पेट' मिळाली, मात्र ती विधानसभेच्या वाटेवर नेऊ शकली नाही. सर्वाधिक "सेफ' जामनेरमध्ये काही उलटफेर होण्याचा प्रश्‍नच नव्हता. चाळीसगावला सुरवातीला खासदार उन्मेश पाटलांनी उमेदवारीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे संघर्ष निर्माण झाला. नंतर त्यावर पडदा पडला असला तरी, मंगेश चव्हाणांना विजयासाठी बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला. 

आत्मचिंतनाची वेळ 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जळगाव व रावेरच्या उमेदवारीवरून भाजपने जिल्ह्यात जे राजकारण केले, त्याचा पुढचा टप्पा म्हणून विधानसभेच्या लढतींकडे पाहिले पाहिजे. उमेदवारीचा प्रश्‍न उद्‌भविण्यापूर्वीच ए. टी. पाटलांसंबंधीची कथित क्‍लीप, स्मिता वाघांची उमेदवारी रद्द करुन उन्मेष पाटलांना ऐनवेळी उमेदवारी देणे, रावेरच्या उमेदवारीचा तिढा अखेरपर्यंत ताणून धरणे... या प्रक्रियेत भाजपची एकूणच शिस्त धाब्यावर बसली. त्याचवेळी विधानसभेचे "हिशोब' तयार होते. आता हे हिशोब भाजपला महागात पडले. वर्चस्वाच्या लढाईत दोन जागांचे "समर्पण' हे काल-परवापर्यंत जिल्ह्यात एकसंध असलेल्या भाजपला व पर्यायाने श्रेष्ठींना आत्मचिंतन करायला लावणारे आहे.. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com