भाजपचा बडा पदाधिकारी आहार पुरवठादाराला वाचविण्याची धडपड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

जळगाव ः जिल्ह्यात अंगणवाडीत पुरविण्यात येणारा पौष्टिक पोषण आहार पुरवठ्याचा ठेका गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथील भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथे उघडकीस आलेले बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण दाबून पुरवठादाराला वाचविण्याची धडपड सुरू झाल्याचे दिसत आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात अंगणवाडीत पुरविण्यात येणारा पौष्टिक पोषण आहार पुरवठ्याचा ठेका गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथील भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथे उघडकीस आलेले बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण दाबून पुरवठादाराला वाचविण्याची धडपड सुरू झाल्याचे दिसत आहे. 

अंगणवाडीतून सहा महिने ते तीन वर्षे वयातील बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना पौष्टिक आहार दिला जातो. हा आहार पुरवठा करण्याचे काम यापूर्वी स्थानिक बचतगटांना देण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून या कामाचे कंत्राट संस्थांना देण्यात आले आहे. यात महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था मर्यादित, धुळे या संस्थेकडून जळगाव जिल्ह्यासह अन्य पाच जिल्ह्यांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत आहे. 

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न 
धुळे येथील संबंधित संस्थेकडून पुरवठा करण्यात आलेल्या पाकिटबंद शेवयांना बुरशी व दुर्गंधी येत असल्याचे अंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील अंगणवाडीत उघडकीस आले आहे. साधारण 36 बुरशीयुक्‍त पाकिटांचा पुरवठा या अंगणवाडीत झाला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषदेत गाजले खरे, पण पुरवठादार भाजपचा बडा पदाधिकारी असल्याने आता हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

पोलिसात अडले प्रकरण 
शालेय पोषण आहार प्रकरणात सर्व पुरावे आल्यानंतरही संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे प्रकरण पोलिस प्रशासनापर्यंत येऊन अडकले होते. तसेच अंगणवाडी पोषण आहार प्रकरणाचेही सुरू असून, बुरशीयुक्‍त शेवया पुरवठा प्रकरणात कोणत्या आधारावर गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्‍न पोलिसांकडून उपस्थित होत आहे. यामुळे बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण रेंगाळण्याचे चित्र आहे. 

तपासणीसाठी पाठविले नमुने 
बुरशीयुक्‍त शेवयांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीईओ शिवाजी दिवेकर यांनी जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांची रॅंडमली तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तपासणी पूर्ण झाली असून, दोन- तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार असल्याचे महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी सांगितले. शिवाय, शेवयांचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून, संबंधित पुरवठादारास दंड करण्यात येणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon bjp anganvadi aahar