भाजप जिल्हाध्यक्षपदाचा काटेरी मुकुट 

jalgaon bjp president
jalgaon bjp president

भाजपच्या अंतर्गत वादातून झालेल्या हाणामारीच्या वातावरणातच जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची निवड झाली. त्यामुळे आगामी काळात कोणते प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत, याची जाणीव निवडीअगोदरच कार्यकर्त्यांनी त्यांना करून दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षपदाचा मुकुट चढवीत असताना आपल्यासमोरचे काटेही हरिभाऊंना जाणवत असावेतच. त्यामुळे अंतर्गत कलहाचे हे काटे दूर करून सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना आव्हान देऊन यश मिळविण्याची कसरत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळेंना करावी लागणार आहे. 


"पार्टी विथ डिफरन्स' असे काही बोजड शब्द वापरण्यापेक्षा एक सुसंस्कृत पक्ष म्हणून भाजपकडे बघितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात व्यासपीठावरच झालेल्या हाणामारीमुळे पक्ष बेशिस्त झाला आहे का? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांचे अंतर्गत वाद आहेत. त्यांचे वाद मिटविण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून फारसे प्रयत्न झालेले नाहीत. वरवर हे वाद शमल्याचे दिसत असले, तरी वेळोवेळी हे वाद जाहीरपणे दिसून आले आहेत. 
नेत्यांचे वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नसतानाच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतही अंतर्गत वाद जोरदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षात व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांची झालेली हाणामारीमुळे जिल्हा भाजपची प्रतिमा राज्यात मलिन झाली होती. त्यानंतर लोकसभा व विधानसभेत मिळालेल्या यशामुळे पक्षातील या वादावर पडदा पडण्याची शक्‍यता होती. मात्र महानगराध्यक्ष निवडीवरून भुसावळ भाजपत अंतर्गत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यवसान भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत थेट व्यासपीठावर कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले. त्यामुळे पुन्हा पक्षातील बेशिस्तीचे दर्शन दिसून आले. 

भारतीय जनता पक्षाची केंद्रात, राज्यात सत्ता होती, जिल्ह्यातील विरोधकही कमकुवत होते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वादाचा फारसा परिणाम पक्षाच्या निवडणूक यशावर झाल्याचे दिसून आले नाही. परंतु, आता स्थिती बदलली आहे. केंद्रांत पक्ष सत्तेवर असला तरी राज्यात पक्षाची सत्ता गेली नाही. आता मित्रपक्ष असलेली शिवसेनाही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबतीला आहे. अशा स्थितीत पक्षाची ताकद वाढविणे हे मोठे आव्हान असणार आहे. नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले हरिभाऊ जावळे यांना पक्ष संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्यापुढे आपल्या पक्षातील अंतर्गत कलह मिटविण्याचेच मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत कलहाचा फटका स्वतः जावळे यांनाही विधानसभा निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे तो मिटविण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. जर त्यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांतील अंतर्गत वाद मिटविले, तर आगामी काळात सत्ताधारी असलेले शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशीही टक्कर देता येईल. अन्यथा पक्षालाही पुढील निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागेल आणि अपयशी जिल्हाध्यक्षपदाचा शिक्काही त्यांच्यावर बसेल. त्यामुळे श्री. जावळे जिल्हाध्यक्षपदाचा हा काटेरी मुकुट कसा सांभाळतात, याकडेच आता पक्षनेतृत्वासह जिल्ह्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com