Vidhan sabha : "जळगाव ग्रामीण'ची जागा द्या, अन्यथा उमेदवार बदला!; भाजप आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

जळगाव : गेल्या पाच वर्षांत सहकार राज्यमंत्र्यांनी केवळ आपल्याच समर्थकांना सोबत घेऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून अपमानाची वागणूक दिली. त्यामुळे युती झाल्यास जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी; अन्यथा शिवसेनेने उमेदवार तरी बदलावा. दोन्हीही पर्याय मान्य नसतील तर मात्र आम्ही पाटलांविरोधात उमेदवार देऊ, असा निर्धार भाजप ग्रामीणच्या मेळाव्यात करण्यात आला. 

जळगाव : गेल्या पाच वर्षांत सहकार राज्यमंत्र्यांनी केवळ आपल्याच समर्थकांना सोबत घेऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून अपमानाची वागणूक दिली. त्यामुळे युती झाल्यास जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी; अन्यथा शिवसेनेने उमेदवार तरी बदलावा. दोन्हीही पर्याय मान्य नसतील तर मात्र आम्ही पाटलांविरोधात उमेदवार देऊ, असा निर्धार भाजप ग्रामीणच्या मेळाव्यात करण्यात आला. 
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा भाजपचा मेळावा पाळधी येथील गुरुकृपा लॉन्सवर आज दुपारी पार पडला. या मेळाव्याच्या ठिकाणी रात्री झालेली तोडफोड व गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर आज पाळधीत तणावपूर्ण वातावरण होते. भाजप, शिवसेनेतील विशेषत: सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांच्या वादाची याला किनार होती. 
मेळाव्यास ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, माजी जि. प. सभापती पी. सी.(आबा) पाटील, संजय महाजन, प्रभाकर पवार, चंद्रशेखर अत्तरदे, माजी जि. प. सदस्य कमलाकर रोटे, "जळगाव कृउबा'चे माजी सभापती लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मंत्री गुलाबराव पाटील "लक्ष्य' 
संपूर्ण मेळाव्यात सर्वांचे "लक्ष्य' गुलाबराव पाटीलच होते. गेल्या पाच वर्षांत राज्यात युतीचे सरकार असूनही पाटलांनी भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कशी वागणूक दिली? या काळात मतदारसंघात कोणतीही विकासकामे झाली नाहीत, मतदारसंघ भकास झाला, अशी टीका करण्यात आली. 

कोण काय बोलले... 
लक्ष्मण पाटील
: राज्यमंत्र्यांनी मतदारसंघात केलेली कामे बोगस आहेत. भर पावसाळ्यात डांबरीकरणाचे भूमिपूजन करणारे हे अजब मंत्री आहेत. लंगोट घालून मैदानात उतरल्याची भाषा गुलाबराव करीत असतील तर आम्हीही त्यासाठी तयार आहोत. 

पी. सी. (आबा) पाटील : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून हिंदुत्ववादी संघटनांना हिणवणाऱ्या व्यक्तीचा प्रचार आम्ही कसा करणार? मतदारसंघातील अवैध धंदे, दोन नंबरची कामे करणाऱ्या उमेदवारासोबत आम्ही नाही. मुक्ताईनगरात जाऊन शिवसेनेसाठी जागा मागतात, मग आम्हीही जळगाव ग्रामीणची मागणी करीत आहोत. ही जागा भाजपला सोडावी, अन्यथा उमेदवार बदलावा. 

चंद्रशेखर अत्तरदे : भुसावळवाल्यानां पुरून उरलो. मग जळगाव ग्रामीणची काय गत? जो येईल समोर त्याला आपण पाहून घेऊ. मी बोलत नाही, करून दाखवितो. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे उद्‌घाटन होत असताना भाजप कार्यकर्त्यांना डावलले जाते. हे युतीचे सरकार आहे की नाही? 

सुभाष पाटील : आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसेल तर असा उमेदवार आम्हाला चालणार नाही. गुलाबराव पाटलांचे काम आम्ही कदापि करणार नाही. ही जागा भाजपला सोडावी, अन्यथा शिवसेनेने उमेदवार बदलावा. दोन्ही बाबी झाल्या नाहीत तर आम्ही आमचा उमेदवार देऊ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp jalgaon gramin melava