PHOTO सत्ताधारी भाजपला सदस्य फुटण्याची भिती; वीस सदस्य सहलीला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

"भाजपचे सर्व 33 सदस्य सोबत आहेत. आम्हाला साथ देणारे कॉंग्रेसचे सदस्य देखील सोबत राहणार असून ते देखील सहलीत सहभागी होण्यासाठी येणार आहेत.' 
- नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद जळगाव 

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. एकिकडे महाविकास आघाडी स्थापन करून जिल्हा परिषदेची सत्ता घेण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. तर अडीच वर्ष कॉंग्रेससोबत असलेली युती राखूनच जि.प.ची सत्ता कायम ठेवण्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. असे असले तरी सत्ताधारी भाजपला सदस्य फुटण्याची भिती असल्याने आपल्या सदस्यांना सहलीला घेवून पदाधिकारी आज रवाना झाले. 

संबंधीत बातमी > भाजप, कॉंग्रेस युतीचा जि. प. अध्यक्ष होणार 

Image may contain: 3 people
जिल्हा परिषदेतील अध्यक्ष कार्यकाळ पुर्ण झाला असून, नवीन वर्षात म्हणजे 3 जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे. यानंतर 6 जानेवारीला विषय समिती सभापती निवड होणार आहे. अशात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष नेत्यांची बैठक झाली. यात अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघातून तर उपाध्यक्ष जळगाव लोकसभा मतदार संघातून करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय भाजप- कॉंग्रेस युतीने अध्यक्ष भाजपचा राहणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले. जि. प. पदाधिकारी निवडीमुळे राजकारण तापले आहे. बहुमत नसतानाही महाविकास आघाडीने देखील जि.प.वर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फोडाफाडीचे राजकारण होऊ नये; अर्थात आपले सदस्य फुटू नये या भितीने भाजपचे काही सदस्य अध्यक्ष बंगल्यावरून आज (ता.29) दुपारी साडेचारच्या सुमारास सहलीला रवाना झाले. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor

मुक्‍काम कोल्हे हिल्सवर 
आज दुपारी साडेचारला भाजपचे 20 ते 25 सदस्य अध्यक्ष बंगल्यावरून सहलीसाठी गाड्यांमधून रवाना झाले. परंतु, या सर्व सदस्यांना मुक्‍काम कोल्हे हिल्सवर असून, सोमवारी ते जळगावातून बाहेर ट्रिपला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय, काही सदस्य हे आज सहलीत सहभागी न होता उद्या (ता.30) थेट सहलीच्या ठिकाणी मिळणार आहेत. हे सर्व सदस्य 3 जानेवारीपर्यंत जिल्ह्याच्या बाहेर असणार आहे. रविवारी दुपारपर्यंत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्षांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यानंतर पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp jilha parishad member tour