भाजपचा मेळावा रद्द झाल्याने उमेदवार नाराज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजपचा नियोजित मेळावा ऐनवेळी रद्द करावा लागला, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी मंत्री मुंबईकडे रवाना झाले, प्रदेशाध्यक्षांच्या नातलगाच्या निधनाने त्यांचा दौरा रद्द झाला. माजी मंत्री एकनाथ खडसे शहरात होते, मात्र तेदेखील मेळाव्यास गेले नाहीत, त्यामुळे हा मेळावाच रद्द झाल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर केले. 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजपचा नियोजित मेळावा ऐनवेळी रद्द करावा लागला, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी मंत्री मुंबईकडे रवाना झाले, प्रदेशाध्यक्षांच्या नातलगाच्या निधनाने त्यांचा दौरा रद्द झाला. माजी मंत्री एकनाथ खडसे शहरात होते, मात्र तेदेखील मेळाव्यास गेले नाहीत, त्यामुळे हा मेळावाच रद्द झाल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर केले. 
कोणत्याही निवडणुकीत प्रचाराचे अचूक नियोजन करणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकीसाठीही तसे नियोजन आखले असून त्याचा भाग म्हणून गुरुवारी दिवसभर प्रचारसभा, कॉर्नरसभा, प्रचारफेऱ्या, मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने विविध भागातील प्रचारसभांसाठी तसेच मेळाव्याची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. 

मेळावा रद्दने नाराजी 
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मॉडर्न गर्ल्स हायस्कूल येथे दुपारी 1 वाजता भाजप उमेदवार, बूथ प्रमुख, महानगर पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. काल रात्रीपर्यंत मेळाव्याचे निरोप सर्वांना देण्यात आले. मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार, खासदार मार्गदर्शन करणार होते. मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली. दुपारपर्यंत कार्यकर्तेही त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले. मात्र, ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे भोळेंनी जाहीर केले व कार्यकर्ते नाराज होऊन परतले. 

नेत्यांचे दौरेच रद्द 
मेळावा रद्द होण्यामागे नेत्यांची अनुपस्थिती हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या व्याह्यांचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे शहरात सकाळीच दाखल झाले. काही ठिकाणी त्यांनी प्रचारफेरीही काढली. मात्र, राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री सर्व मंत्र्यांची बैठक बोलाविल्याने कांबळे यांच्यासह गिरीश महाजन मुंबईकडे दुपारीच रवाना झाले. या बैठकीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. त्यामुळे मेळावा रद्द करण्याची वेळ भाजपवर आली. 
 
खडसे शहरात तरीही अनुपस्थिती 
आतापर्यंत पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त असलेल्या एकनाथ खडसेंनी आजपासून काही उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. त्यासाठी ते सकाळपासूनच शहरात होते. परंतु, ते असतानाही मेळाव्याला आले नाहीत. मेळाव्यास उपस्थितीबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली की, मेळावा रद्द झाल्याचा निरोप त्यांना पोचविण्यात आल्याने ते आले नाहीत, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
 
 उमेदवार, कार्यकर्त्यांचा मेळावा होता. प्रदेशाध्यक्ष दानवे येणार होते. त्यासाठी मलाही बोलावले होते. दानवेंचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. "गिरीशभाऊ आले की सांगा, मी येतो' असे मी सांगितले. मात्र, तेदेखील आले नाही म्हणून मी मेळाव्यास गेलो नाही. 
-एकनाथ खडसे 
 
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व बूथप्रमुख अशा संवादासाठी मेळावा आयोजित केला होता. मात्र, दानवेंच्या व्याह्याचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे मेळावा रद्द करावा लागला. 
-आमदार सुरेश भोळे. 

Web Title: marathi news jalgaon bjp medava cancal