बहुमत "भक्कम' तरीही भाजप भयभीत : "मनपा'चे वास्तव 

बहुमत "भक्कम' तरीही भाजप भयभीत : "मनपा'चे वास्तव 

जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत असलेल्या निर्णयांबाबत जनताच संभ्रमात आहे. महापालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हातात आहे, असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. 
जळगाव महापालिकेतील सत्ता आणि राज्यातील पक्षाची सत्ता यांच्यात अनेक वर्षे संघर्षच राहिला. त्यामुळे शहर विकासाचे अनेक प्रश्‍न सुटलेच नाहीत. या निवडणुकीत प्रथमच मतदारांनी केंद्रासह राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाकडेच जळगाव महापालिका सोपविली. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी मी जळगाव महापालिका दत्तक घेत आहे, आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन केले होते; तर जलसपंदामंत्री महाजन यांनीही माझ्या शब्दावर विश्‍वास ठेवा..! असे भावनिक मत व्यक्त केले. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तब्बल 57 नगरसेवक निवडून हुकमी बहुमत दिले. 

आक्रमक विरोधक, भयभीत सत्ताधारी 
महापालिकेत भाजपक्षाची सत्ता स्थापन होऊन केवळ चार महिने होत आले. अर्थात हा कालावधी कमीच आहे. एवढ्या कालावधीत नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना पालिकेची माहितीही होत नाही. परंतु अशाही स्थितीत सत्तेतील सर्वच माहिती असलेल्या विरोधी पक्षाने सत्तेतील भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यामुळे सध्यातरी सत्तेतील भाजप भयभीत झाल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी असलेली शिवसेना सध्यातरी महापालिकेत भाजपवर वरचढ ठरल्याचे दिसत आहे. 

अतिक्रमणाचा हल्ला, गप्प नेतृत्व 
जळगाव महापालिकेच्या प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू केली. वास्तविक नवीन सत्ता येण्यास केवळ चार महिनेच झाले आहे. भाजपच्याच नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या नवीन नगरसेवकांचा अद्याप अभ्यासही झालेला अशा स्थितीत प्रशासनाने महासभेत कोणतीही माहिती न देता थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.यामुळे नवीन नगरसेवक हा काय प्रकार आहे?अशा संभ्रमात आहेत. महापालिकेत महासभा, स्थायी सभा होतात मग त्यात हा प्रश्‍न न येताच ही कारवाई कशी होते आहे? असा प्रश्‍न या नगरसेवकांना पडला आहे. कारवाईला विरोध करावा तर नगरसेवकपद जाणार ही भईती त्यांना दाखविली जात आहे. दुसरीकडे विरोधी शिवसेना आक्रमक झाली असून सत्ता भाजपचे नगरसेवक त्यांना उत्तर देण्यात पिछाडीवर पडले आहेत. याशिवाय पक्षाचे आमदार सुरेश भोळे उत्तर देत आहेत; परंतु ते एकाकी पडल्याचे दिसते. अशा स्थितीत ज्यांनी जळगाव शहराच्या विकासाची हमी घेतली ते कोणतेही नेते बोलत नाहीत, ते गप्प आहेत. 

महापालिका वाऱ्यावर? 
निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासासाठी महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री महाजन यांनी शहराचे प्रश्‍न सोडवून विकासकामांची हमी दिली. मात्र, आज जळगाव शहरात अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. तसेच गाळेधारकांचा प्रश्‍न आता गळ्याशी आलेला आहे. अशा स्थितीत ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला त्या भाजपच्या नेतृत्वाने पुढे येऊन उत्तर देण्याची गरज आहे. मात्र, तेच आता गप्प आहेत, तर दुसरीकडे प्रशासन कारवाईचा धडका करीतच आहे, तर विरोधक हल्ला करीत आहेत. अशा स्थितीत भाजपचे नेतृत्वच विरोधकांच्या बाजूने असल्याचा संदेश जनतेत जात आहे. त्यामुळे सध्यातरी जळगाव सत्ता कोणाची? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com