अजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...! 

अजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...! 

"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी "अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे "सेनापती' कामालाही लागले. मात्र, 2019 च्या "स्वारी'वर निघालेल्या या "सेनापतीं'ना पक्षातील अस्वस्थता दिसत नसेल आणि दिसत असली, तरी त्यावर उपाय करायचा नसेल, तर "अजेय' भारताचा संकल्प करत "अटल' निर्धाराने मार्गक्रमण करणाऱ्या नेतृत्वाला पक्ष "अभेद्य' ठेवण्याचे आव्हान पेलावे लागेल... 

काही वेळा अपरिहार्य बनलेले विशेष यश नशिबी आले, की ते यश केवळ आपल्या कर्तृत्वातूनच मिळालेय, या भावनेने आपण हुरळून जातो. हे हुरळणे म्हणजे एकप्रकारचा नशाच असतो आणि अशा नशेत मग वास्तवाची जाण करून देणारे सत्य समोर आले, तरी ते स्वीकारायचे नाही, अशी मानसिकता होऊन जाते. केंद्रातील व राज्यातील तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारच्या बाबतीत जे 2014 मध्ये झाले, तेच आता गेल्या चार-पाच वर्षांतच सत्तेच्या नशेत असलेल्या भाजपच्या बाबतीत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने "अजेय भारत'चा नारा देत रणशिंग फुंकलेय. पक्षाचे प्रदेशाचे सेनापती रावसाहेब दानवे त्यासाठी राज्यभर दौऱ्यावर निघालेले. पहिल्या टप्प्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि आता दुसऱ्या टप्प्यात खानदेशात रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी ते शनिवारी येऊन गेले. गेली अडीच वर्षे मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथराव खडसेंसह त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता, नाराजीचा सामना दानवेंना करावा लागला. भुसावळ येथील बैठकीत खडसे समर्थकांनी त्यांच्या पुनर्वसनाबाबत जाब विचारला. अर्धा तास गोंधळ झाला. मात्र, दानवे कार्यकर्त्यांचे समाधान करू शकले नाहीत. भुसावळच्या बैठकीतील गोंधळाचा संदर्भ देत जळगावातही पत्रकारांनी दानवेंना छेडले असता, "असे काही झालेच नाही,' असा दावा करत खडसेंचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पक्ष काही करू शकत नाही, अशी हतबलता व्यक्त केली. पण, खडसेंचे कुठले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, याचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हते. 

पुढे जाऊन धुळ्यातही महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात स्थानिक आमदार अनिल गोटे व त्यांच्या समर्थकांनी अपेक्षेप्रमाणे गोंधळ घातला. त्या ठिकाणीही तेच कारण. नेतृत्वाविरोधात स्थानिकांची अस्वस्थता. आगामी काळात धुळे शहरातही अस्वस्थता आणि निवडणुकीची धुरा सोपविलेल्या मंत्री गिरीश महाजन व गोटे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होईल. जळगाव, धुळे असो की नाशिक; सर्वच ठिकाणी भाजपमध्ये कमी- अधिक प्रमाणात ही अस्वस्थता खदखदत आहे; परंतु वास्तव असूनही ते स्वीकारायला भाजपचे नेतृत्व तयार नाही. 

2014 सारखी आताची स्थिती नाही. त्यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अनेक वर्षे सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आणि मजबूत "मोट' असलेल्या भाजपमधील लहान-मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आणि जनतेनेही त्याला साथ दिली. आता पक्षाची "मोट' त्यावेळसारखी राहिली नाही. जळगावात खडसे, धुळ्यात गोटे, नाशिकमध्ये स्थानिक आमदार असे ठिकठिकाणी पक्षांतर्गत नेतेच अस्वस्थ आहेत. पक्षनेतृत्वाच्या "आशीर्वादा'ने प्रत्येक जिल्ह्यात गटबाजीचे चित्र दिसू लागले आहे. तरीही पालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकल्या, म्हणजे जनमत आपल्या बाजूने, अशी मानसिकता झालेल्या भाजपला त्यांच्याच पक्षातील वाढती अस्वस्थता समजून घेण्याची इच्छा नसेल, तर ज्या "अटल' निर्धाराने भाजपने 2019 च्या निवडणुकीसाठी "अजेय भारत'चा संकल्प केला आहे, त्याला पक्षांतर्गत बंडाळीतूनच सुरुंग लागेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com