भाजप फलकावर सेनानेत्याच्या छायाचित्राचा वाद प्रदेशाध्यक्षांकडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

जळगाव : मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता. 30) लावलेल्या भाजपच्या फलकांवर शिवसेनानेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र झळकल्याने जिल्हाभरात वादंग उठले असून हा वाद प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. काही भाजप पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा ठरला होता. ऐनवेळी सकाळी तो रद्द झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या अधिकृत फलकांवंर झळकलेल्या शिवसेनानेते तथा मंत्री गुलाबराव पाटलांच्या छायाचित्राचा विषय चांगलाच गाजत आहे. भाजपच्या अन्य मंत्री, पदाधिकाऱ्यांसोबतच या फलकावर गुलाबरावांचे छायाचित्र टाकल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या फलकावर भाजपच्या स्थापनादिनाचा (6 एप्रिल) उल्लेख असून त्यादिवशी मुंबईत आयोजित मेळाव्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. 
दरम्यान, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी युतीचे सरकार व जिल्ह्यातील मंत्री म्हणून त्यांचे छायाचित्र टाकल्याची सारवासारव केली खरी, मात्र काही पदाधिकाऱ्यांनी हा वाद प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात नेला आहे. यासंदर्भात रावसाहेब दानवेंकडे तक्रार गेल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी दानवेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. या तक्रारीबाबत दानवे काय भूमिका घेतात, याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, हा वाद उद्‌भवल्यानंतर आजही हे फलक शहरातील विविध चौकात कायम होते.

Web Title: marathi news jalgaon bjp photo